नर्गिस दत्त नगरमध्ये बांगलादेशींचे वास्तव्य, आगीच्या मागे संशयाचा धूर

14

सामना प्रतिनिधी । मुंबई

वांद्रे येथील नर्गिस दत्त नगर झोपडपट्टीत मोठ्या प्रमाणावर अनधिकृत बांधकामे करण्यात आली आहेत. मागील खेपेस लागलेल्या आगीनंतर या झोपड्यांवर दोन ते चार मजले बांधण्यात आले. त्यामुळे आता या झोपडपट्टीला आग लागली की जाणूनबुजून लावण्यात आली याची सखोल चौकशी करण्याची मागणी भाजपचे स्थानिक आमदार ऍड. आशीष शेलार यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. याच झोपडपट्टीत 2014च्या निवडणुकीच्या दरम्यान बांगलादेशी नागरिक व 2100 बोगस मतदार कार्ड सापडली होती याची आठवण यानिमित्ताने राज्य सरकारला करून दिली आहे.

वांद्रे पश्चिम येथील नर्गिस दत्त नगरमध्ये मंगळवारी लागलेल्या आगीत संशयाचा धूर बाहेर पडत आहे. हाच मुद्दा या भागातील भाजपचे स्थानिक आमदार आशीष शेलार यांनीही उचलला. यापूर्वी एकदा आग लागल्यावर नर्गिस दत्तमधील झोपड्यांवर मजले उभे राहिले. बेकायदा झोपड्यांवर कारवाईची आपण सतत मागणी केल्यानंतर रस्त्याच्या लगतच्या झोपड्यांवर काही कारवाई झाली पण त्यानंतर झोपडीवर एक ते तीन व चार मजले बांधण्यात आले असे त्यांनी नमूद केले आहे. याबाबत त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठवले आहे.

झोपड्या पात्र करण्याचे रॅकेट
या आगीचा फायदा घेऊन काही समाजकंटक व दलाल या ठिकाणच्या अनधिकृत झोपड्या अधिकृत करण्याचा प्रयत्न करण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे या ठिकाणी पुनर्विकास योजना तातडीने राबवावी. त्यासाठी नव्याने सर्व्हे करण्याची मागणी शेलार यांनी म्हाडाला पाठवलेल्या पत्रात केली आहे.

बांगलादेशी नागरिकांचे वास्तव्य
म्हाडाच्या जागेवर ही झोपडपट्टी उभी आहे. या जागेवर पुनर्वसनाची योजना 2010पूर्वी तयार झाली मात्र मागील वीस वर्षांपासून ही योजना प्रत्यक्षात आली नाही. त्यामुळे झोपड्यांवर झोपड्या चढत गेल्या. 2014 च्या निवडणुकीत 2100 बोगस मतदारकार्ड व बांगलादेशी नागरिक सापडले होते. नर्गिस दत्त नगरबाबत पालिका आयुक्तांकडे आठ, गृहनिर्माण सचिवांकडे दोन व झोपडपट्टी पुनर्विकास प्राधिकरणात दोन बैठका झाल्या होत्या याकडे शेलार यांनी सरकारचे लक्ष वेधले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या