अश्लील उद्योग मित्र मंडळातून ‘सविता भाभी’ची एक्झिट

6645

प्रदर्शनापूर्वीच वादात सापडलेल्या ‘अश्लील उद्योग मित्र मंडळ’ या चित्रपटातून सविता भाभी या व्यक्तिरेखेची एक्झिट झाली आहे. सविता भाभी या ब्रँडवर आपला हक्क असून या चित्रपटामध्ये हे नाव आणि व्यक्तिरेखा आपल्या परवानगीशिवाय वापरल्याचा दावा एका दिग्दर्शकाने केला होता. यावरून निर्माण झालेला वाद न्यायालयापर्यंत पोहोचला होता. अखेर सामोपचाराने हा वाद मिटवण्यात आला असून चित्रपटातून सविता भाभी ही व्यक्तिरेखा काढून टाकण्यात आली आहे.

‘सविता भाभी’ वरून ‘अश्लील उद्योग मित्र मंडळ’वाल्यांना नोटीस

मंगळवारी मुंबईत चित्रपट निर्माते आणि नितीन गुप्ता यांनी एक संयुक्त पत्रकार परिषद घेतली. त्यात हा वाद सामोपचाराने मिटवण्यात आला आहे असे जाहीर करण्यात आले. तसेच दोन्ही पक्षांत सविता भाभी करार करण्यात आला आहे. या करारानुसार चित्रपटात सर्व ठिकाणी सविता भाभीचा उल्लेख टाळण्यात आला आहे. सविता भाभी वरील गाणे युट्युबवरून काढण्यात येणा असून संपूर्ण चित्रपटात सविता भाभी हा शब्दही काढून टाकण्यात आला आहे. यामुळे प्रेक्षकांचा रसभंग होईल पण त्याला आता इलाज नाही अशी प्रतिक्रिया दिग्दर्शक आलोक राजवाडे यांनी व्यक्त केली. एवढ्या वादानंतर चित्रपट प्रदर्शित होत आहे याचा आनंद निर्मात्यांनी व्यक्त केला.

पुनीत अग्रवाल यांनी सविता भाभी ही व्यक्तिरेखा निर्माण केली आहे. त्याचे सर्व हक्क डॉ.नितीन गुप्ता आणि डॉ बिनय गुप्ता यांच्याकडे सुपुर्द करण्यात आले आहेत. डॉ. नितीन गुप्ता हे आगामी काळात सविता भाभी या व्यक्तिरेखेवर आधारित चित्रपट घेऊन येत आहेत. अश्लील उद्योग मित्र मंडळच्या निर्मात्यांनी पुनीत अग्रवाल यांच्याकडून सविता भाभीचे हक्क घेतले होते. परंतु कॉपीराईट कायदा आणि बौध्दिक संपदा कायद्यानुसार दिलेले हक्क पुन्हा तुम्ही दुसर्‍या व्यक्तीला देऊ शकत नाही. हा सगळा वाद गैरसमजतातून झाला होता असे चित्रपट निर्मात्यांनी सांगितले तसेच हा वाद आता संपला असून अश्लील उद्योग मित्र मंडळ हा चित्रपट ‘सविता भाभी’शिवाय प्रदर्शित होणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या