कार्यकर्त्यांच्या अतिआत्मविश्वासामुळेच काँग्रेस हरली, अशोक चव्हाण यांची कबुली

सामना प्रतिनिधी, नांदेड

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचा अति आत्मविश्वास आणि आपल्याला प्रचारासाठी मिळालेला कमी वेळ ही काँग्रेसच्या पराभवाची मुख्य कारणे आहेत, अशा शब्दात माजी खासदार अशोक चव्हाण यांनी कबुली दिली आहे.

नांदेड उत्तर आणि दक्षिण विधानसभा मतदारसंघातील कार्यकर्त्यांशी संवाद साधण्यासाठी नक्षत्र सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी आमदार डी.पी.सावंत, आमदार अमर राजूरकर यांची प्रमुख उपस्थिती होती. अशोक चव्हाण पुढे म्हणाले की, भाजप सरकारने चार वर्ष दहा महिने जनविरोधी धोरण राबविले आणि शेवटच्या दोन महिन्यात पीकविमा, शेतकऱ्यांना अनुदान आणि सर्जिकल स्ट्राईक यासारख्या बाबी मतदारांपुढे नेऊन भुलैभुलय्या तयार केला. कार्यकर्त्यांना उद्देशून ते म्हणाले की, आपण मात्र गाफील राहिलो. कार्यकर्त्यांचा अति आत्मविश्वास आणि माझ्यावर असलेली राज्याची जबाबदारी पेलण्यासाठी मला मिळालेला कमी वेळ यामुळेच काँग्रेस पक्षाचा नांदेडमध्ये पराभव झाला आहे, असेही अशोक चव्हाण यांनी सांगितले.

आता यापुढे काँग्रेस कार्यकर्त्यांनी आपल्या बुथ कार्यकर्त्यांना अधिक सक्षम केले पाहिजे आणि काँग्रेस पक्षाचे विचार जनसामान्यांमध्ये रुजवले पाहिजेत. विधानसभेच्या 2009 च्या निवडणुकीची पुनरावृत्ती आपल्याला करायची आहे, हे लक्षात घेऊन कार्यकर्त्यांनी कामास लागावे, असे आवाहनही त्यांनी केले. प्रारंभी आमदार डी.पी.सावंत यांनी प्रास्ताविक केले. या बैठकीस नांदेड दक्षिण व उत्तर विधानसभा मतदारसंघातील ग्रामीण भागातील काँग्रेस कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.