विवाहीत जवान प्रेमात पडला, लग्न करता येत नसल्याने जोडप्याची आत्महत्या

गुजरातमधील अहमदाबादेत एका जोडप्याने आत्महत्या केली. या दोघांचे मृतदेह रेल्वे रुळावर सापडले आहे.सुरेंद्रनगर-दुधरेज रेल्वे मार्गावर या जोडप्याने वेगात येणाऱ्या रेल्वेगाडीसमोर स्वत:ला झोकून दिलं होतं. रविवारी सकाळी मालगाडी त्यांच्या अंगावरून गेल्याने दोघांचा मृत्यू झाला. यातील प्रियकर हा विवाहीत असून तो सैन्यदलात होता.

सुरेंद्रनगर रेल्वे पोलिसांनी या घटनेबाबत माहिती देताना सांगितले की अशोक दालसानिया (34 वर्षे) हा जसापारचा रहिवासी होता. ध्रानगध्रा भागात त्याची पत्नी आणि दोन मुलांसह राहात होती. अशोक हा जम्मू कश्मीरमधील उधमपूर इथे तैनात होता. ध्रानगध्रा हा सैन्याचा तळ असल्याने तिथे सैनिकांच्या कुटुंबीयांसाठी विविध सोईसुविधा उपलब्ध करून दिल्या जातात, यामुळे अशोकचं कुटंबही या भागात राहात होतं.

अशोक काही दिवसांपूर्वी आशा नाकुम (20 वर्षे) या तरुणीच्या प्रेमात पडला होता. आशा ही देखील ध्रानगध्रा भागातच राहायला होती. जवळपास दीड महिन्यांपूर्वी अशोक हा उधमपूरमधून बेपत्ता झाला होता. तिथून अशोक गुजरातला परत आला होता आणि आशासोबत तो पळून गेला असं नंतर लक्षात आलं. अशोक अचानक बेपत्ता झाल्याने उधमपूर येथील सैनिकी तळावरचे अधिकारी त्याच्या शोधात घरी पोहोचले होते. घरच्यांकडे चौकशी केली असता अशोक घरी आलाच नसल्याचे त्यांना कळाले.

पोलिसांना प्राथमिक तपासामध्ये कळालं आहे की अशोक आणि आशा यांचं एकमेकांवर मनापासून प्रेम होतं. मात्र अशोक विवाहीत असल्याने तो आशासोबत लग्न करू शकत नव्हता. यामुळे दोघेही दु:खी झाले होते. कोणताच रस्ता दिसत नसल्याने या दोघांनी आत्महत्या करायचं ठरवलं होतं. रविवारी पहाटे हे दोघे सुरेंद्रनगर-दुधरेज रेल्वे मार्गावर पोहोचले आणि दोघे रुळावर झोपले. वेगात येणाऱ्या मालगाडीने या दोघांना उडवल्याने दोघांचा जागीच मृत्यू झाला.

अशोक याच्या पश्चात त्याची बायको, 13 वर्षांचा मुलगी आणि 8 वर्षांचा मुलगा आहे. या घटनेचा तपास करण्यासाठी आपल्याला राज्याबाहेर जाण्याची परवानगी मिळावी अशी विनंती सुरेंद्रनगर रेल्वे पोलिसांनी केली आहे. घटनेच्या तपासासाठी त्यांना उधमपूर इथे जाण्याची परवानगी हवी आहे.

आपली प्रतिक्रिया द्या