बळीराजाची मुले, झाली ‘अशोक’ वनातील फुले!

293

>> ज्योत्स्ना गाडगीळ

२७ वर्षांचा संगणक अभियंता. पदवीधर झालेली बायको. संसार सुरू होऊन जेमतेम पाच महिने झालेत आणि पदरात २५ मुले आहेत! अर्थातच ती स्वत:ची नाही, तर दत्तक घेतलेली आहेत. परभणी, हिंगोली, जालना, संभाजीनगर, बीड, वर्धा जिल्ह्यांतील आत्महत्याग्रस्त आणि दुष्काळग्रस्त कुटुंबांतील ८ ते १५ वयोगटांतील ही मुले ज्या तरुणाने दत्तक घेतली आहेत त्याचे नाव आहे अशोक देशमाने!

दुष्काळ आणि शेतकऱ्यांची आत्महत्या हा विषय महाराष्ट्राला नवीन नाही. एवढी वर्षे या विषयावर चर्चा-परिसंवाद होऊनही त्यातून काहीही निष्पन्न झालेले नाही. अशावेळी सोशल मीडियावर शेतकऱ्यांप्रती कणव दाखवणे, सरकारविरोधात गळा काढणे याऐवजी अशोक देशमाने या तरुणाने थेट `कर्मयोग’ स्वीकारला. तोही साधासुधा कर्मयोग नाही, तर `निष्काम कर्मयोग’! आयटी क्षेत्रातील गलेलठ्ठ पगाराची नोकरी सोडून अशोकने शेतकऱ्यांच्या भावी पिढीला उज्ज्वल भवितव्य देण्याचा ध्यास घेतला आहे.

पुण्यात हडपसर येथे आयटी कंपनीत नोकरी करत असतानाही त्याचे मन गावाकडे धाव घेत असे. असाच एकदा दिवाळीच्या सुट्टीत तो परभणी जिल्ह्यातील आपल्या मंगरुळ गावी गेला असता तिथल्या स्थानिक शेतकऱ्याने दुष्काळाला कंटाळून आत्महत्या केल्याची बातमी त्याच्या कानावर पडली. त्या बातमीने अशोक अंतर्बाह्य हेलावून गेला. आपले गाव, गावकरी, शेजारी-पाजारी दु:खात असताना आपण शहरात सुखात राहतोय, या विचाराने तो अस्वस्थ झाला. त्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून, सुट्टी संपवून तो सुखेनैव पुण्यात परतू शकला असता, परंतु आपला भूतकाळ आठवता तशी परिस्थिती अन्य मुलांवर येऊ नये म्हणून त्याने शिक्षणयज्ञ सुरू केला.

भीषण दुष्काळामुळे लोक गाव सोडून शहरांकडे जाऊ लागले होते. पडेल ते काम स्वीकारत होते. दोन वेळचे अन्न मिळवणे कठीण असलेल्या कुटुंबांना मुलांच्या शाळेचा खर्च भागवणे अशक्य होऊ लागले. हे सर्व चित्र पाहिल्यानंतर अशोकला सर्वात जास्त वाईट वाटले ते मुलांचे शिक्षण अर्धवट सुटत असल्याचे! अशोकने स्वत: प्रतिकूल परिस्थितीवर मात करून अभियांत्रिकीचे प्रशिक्षण पूर्ण केले होते. वडिलांची शेती होती, पण अपेक्षित उत्पन्न नव्हते. अशोकच्या आईच्या मदतीने त्यांनी शिवणकामही केले आणि कसाबसा घरखर्च भागवला. दोन मुलींची लग्ने लावून दिली. अशोकने शेतीकाम करून, दुकानात नोकरी करून आपले शिक्षण पूर्ण केले. त्यामुळे त्याला वेळेची, पैशांची आणि शिक्षणाची किंमत होती. दुष्काळग्रस्त कुटुंबातील मुलांची तशी आबाळ होऊ नये म्हणून आपण त्यांची जबाबदारी स्वीकारायची, असा अशोकने निश्चय केला.
डिसेंबर २०१५ मध्ये अशोकने `स्नेहवन’ नावाची संस्था रजिस्टर केली. गावागावात फिरून त्याने गरजू गुणवंत विद्यार्थ्यांचा शोध घेतला, त्यांच्या पालकांची मनधरणी केली, त्या मुलांचा शैक्षणिक भार उचलण्याचे आश्वासन दिल़े अनेक पालकांनी स्नेहवनच्या वास्तूला भेट देऊन आधी खातरजमा करून घेतली. बऱ्याच प्रयत्नानंतर अशोकला १७ विद्यार्थी सापडले. त्यांना शोधण्यात त्याला मित्रपरिवाराची मोठी मदत झाली. अशोकमधल्या संवेदनशील कवीचे अनेक चाहते आहेत. तेदेखील या कार्यासाठी पुढे सरसावले. अनिल कोठे नामक सद्गृहस्थांनी जागेचा मुख्य प्रश्न सोडवला. पुण्यातील भोसरी येथील आपला पाच खोल्यांचा रिकामा बंगला त्यांनी अशोकला स्नेहवनसाठी दिला. रिकामा बंगला मुलांच्या आवाजाने दुमदुमून गेला. सुरुवातीला मुले राहण्यासाठी राजी नव्हती. परंतु त्यांना समजावून, उमजावून शिक्षणाचे महत्त्व पटवून अशोकने त्यांचे मन वळवले. मुलांची अशोककाकाशी मस्त गट्टी जमली. पण नोकरी सांभाळून मुलांना पूर्णवेळ देता येणे अशोकला शक्य नव्हते. त्याची समाजसेवा पाहता त्याचे आई-वडीलही स्नेहवनात येऊन राहू लागले. आता तिथे एकूण २५ मुले स्नेहवनाचे निवासी झाले आहेत.

ashok-deshmaneअशोकचे शिक्षण, नोकरी पाहता बरीच स्थळे त्याला सांगून येत होती, नोकरी सोडल्यानंतरही स्थळांचा ओघ कायम होता. तेथील प्रथेनुसार वधुपक्षाची हुंडा द्यायचीही तयार होती. परंतु अशोकचा या प्रथेलाच विरोध होता. बहुतांशी शेतकरी मुलीच्या लग्नात भरमसाट हुंडा देण्याच्या धडपडीत कर्जबाजारी होतात आणि ते फिटले नाही की मृत्यूला कवटाळतात. याच विचाराने अशोकने हुंडाविरोधी चळवळ सुरू केली. लोकांना आपल्या कृतीतून आदर्श घालून दिला. एखाद्या गरीब शेतकऱ्याच्या मुलीशी साधेपणाने लग्न करायचे, असे त्याने ठरवले. फक्त त्याची एकच अट होती येणाऱ्या मुलीने स्नेहवनातील मुलांचा आई होऊन सांभाळ करावा. अर्चनाच्या रूपात अशोकची ती इच्छाही पूर्ण झाली. आज ते दोघे मिळून स्नेहवनातील मुलांचा सांभाळ करत आहेत.

कॉलेजमध्ये शिकत असल्यापासून अशोकसमोर बाबा आमटेंच्या समाजकार्याचा आदर्श होता. तो विविध समाजकार्यात भाग घेत अस़े पाड्यावरच्या मुलांना मोफत शिकवीत असे. नोकरीत रुजू झाल्यावर पगाराचा दशांश भाग समाजकार्यासाठी देत असे. त्याच्या मनात रुजलेल्या याच बीजाचा पुढे स्नेहवनाच्या रूपात वटवृक्ष झाला. त्याने मुलांना जवळच्या शाळेत प्रवेश मिळवून दिला. रोज मुलांचा अभ्यास घेणे, श्लोक शिकवणे, व्यायाम करवून घेणे, सूर्यनमस्कार घालणे, गाणी शिकवणे, चित्रकला, तबला, हार्मोनिअमचे प्रशिक्षण देणे हा स्नेहवनातील विद्यार्थांच्या दिनचर्येचा भाग बनला.

मुलांचा आत्मविश्वास वाढावा म्हणून रोज सायंकाळी अशोक सर्व मुलांना मोकळ्या मैदानात गोलाकार बसवून `रिंगण’ नामक खेळ घेतो. त्यात प्रत्येकाने दररोज काही ना काही सादर करायचे असते. या उपक्रमामुळे सुरुवातीला चारचौघात बोलायला घाबरणारी मुले आता शे-दोनशे लोकांसमोर कथा-कवितांचे बेधडक सादरीकरण करू लागली आहेत.

अशोकने आपल्या ध्येयाच्या दिशेने वाटचाल सुरू केली आहे, पण आर्थिक गणित जुळवताना आजही त्याची तारांबळ उडत आहे. तो सांगतो, `भरपूर काम करण्याची इच्छा आणि तयारी असली, तरी जागेचा आणि पैशांचा मुख्य प्रश्न दिवसेंदिवस तीव्र होत चालला आहे. सध्या निवासी विद्यार्थ्यांचा एका मुलामागे साधारण २५०० रुपये खर्च येतो, त्यात आजारपणाचा खर्च वेगळा असतो. तर जवळच्या पाड्यावरील नंदी समाजातील २० विद्याथ्र्यांचा शैक्षणिक खर्च एका मुलामागे १५०० रुपये आहे.’ अशा एकूण ४५ मुलांचा सांभाळ अशोक करत आहे.

कालपर्यंत पुण्यात राहणाऱ्या लोकांनाही स्नेहवनाची कल्पना नव्हती. प्रसार माध्यमांमुळे हळूहळू त्याची चर्चा होऊ लागली आहे. काही जण फोनवर शुभेच्छा देतात, काही प्रत्यक्ष भेट देतात, पण मदतीचा ओघ अजून फारसा आलेला नाही, अशी खंत तो व्यक्त करतो. शेतकऱ्यांच्या मुलांना चांगले शिक्षण मिळवून देण्यासाठी अनेक दात्यांची गरज लागणार आहे.
एका अमेरिकन दांपत्याने स्नेहवनाला तीन संगणक भेट दिले. आज त्याचा वापर करून तिसरीतला विद्यार्थीदेखील सफाईने मराठी टायपिंग करू लागला आहे. अशा अनेक गरजू मुलांना शिक्षणाची संधी मिळवून देण्यासाठी अशोकची धडपड सुरू आहे. तो सांगतो, `आज माझ्या मार्गात अनेक अडथळे येत असले, तरी ध्येय स्पष्ट दिसत आहे आणि त्यादृष्टीने माझी घोडदौड सुरू आहे.’

अशोकला गावागावांतून, जिल्ह्याजिल्ह्यांतून शेतीशाळा सुरू करण्याची तीव्र इच्छा आहे. तो सांगतो, `भारत कृषिप्रधान देश आहे. तरी आपल्या अभ्यासक्रमात कृषी विषयाचे मुलांना ज्ञान दिले जात नाही. अजूनही आमचे शेतकरी पारंपरिक शेती करतात. विकसित तंत्रज्ञानाचा अवलंब करत नाहीत, कारण ते त्यांच्यापर्यंत अजून पोहोचलेलेच नाही. ते योग्य पद्धतीने पोहोचावे यासाठी शेतीशाळांची नितांत गरज आहे. जेणेकरून भावी शेतकरी योग्य प्रशिक्षण घेऊन शेतीतून भरघोस उत्पन्न घेऊ शकेल. दुष्काळाशी दोन हात करू शकेल. दुष्काळाला नुसता निसर्ग नाही, तर शेतकरीही जबाबदार आहे. रासायनिक खतांचा वापर करून त्याने स्वत:च्या हातांनी शेती निकामी केली आहे. त्यासाठी गरज आहे योग्य प्रशिक्षणाची. ग्रामीण भागातील मुलांना तंत्र,यंत्र, शेतीप्रशिक्षण मिळाले तर त्यांना रोजगार संधी मिळतील आणि शेतकरी आत्महत्येचे दुष्टचक्रही थांबेल.’

अशोकच्या या प्रगत विचारांनी अनेक तरुण भारावले आहेत. त्यांनीही अशोकप्रमाणे हुंडा न घेता लग्न करण्याचा निर्णय घेतला आहे. अनेक जण स्नेहवनासाठीही हातभार लावत आहेत. अनेक आजी-आजोबा मुलांचा सांभाळ करण्यासाठी पुढाकार दर्शवत आहेत. अशोकच्या कृतीमुळे हा सकारात्मक बदल घडत आहे, तो अजूनही मोठ्या प्रमाणात घडू शकणार आहे. त्यासाठी गरज आहे आपल्या सहकार्याची. समाजसेवेला वाहून घेतलेला कवीमनाचा अशोक आवाहन करतो,
या सुखांनो साद घालू, दु:खितांच्या जिवनी! 

मदतीसाठी तपशील :
स्नेहवन, हनुमान कॉलनी २, हनुमान मंदिराजवळ, चक्रपाणी वसाहत, भोसरी, पुणे – ४११०३९
Bank Details
Account Name – Snehwan
Account Type – Current
Branch Name – Pimpri Town
Swift Code – SBININBB200
Bank Name – State Bank Of India
Account Number- 35517151681
IFSC Code – SBIN0005923

संपर्क – 8796400484
इ मेल – [email protected]
website- www.snehwan.in

आपली प्रतिक्रिया द्या