गद्दार वादानंतर पहिल्यांदाच अशोक गेहलोत व सचिन पायलट एकत्र

राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी गेल्या आठवड्यात सचिन पायलट यांना गद्दार म्हणत त्यांच्यावर निशाणा साधला होता. या दोघांमधून गेल्या काही दिवसांपासून विस्तव जात नाहीए. एकाच पक्षात एकमेकांचे कट्टर प्रतिस्प्रर्धी असलेले गेहलोत व पायलट हे मंगळवारी एका मंचावर आले होते. निमित्त होते भारत जोडो यात्रेचं.


राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा 5 डिसेंबरला ऱाजस्थानमध्ये प्रवेश करणार आहे. त्यानिमित्ताने नुकतीच राजस्थानमधील नेत्यांची बैठक पार पडली. या बैठकीत अशोक गेहलोत व सचिन पायलट दोघेही उपस्थित होते. त्यानंतर सर्व नेते एकत्र मीडियासमोर आले तेव्हाही हे दोघे एकमेकांच्या शेजारी उभे होते. ते पाहून अनेकांच्या भुवया उंचावल्या.

काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी या भेटीचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. ”आज जयपूरमध्ये राजस्थानचे खासदार वेनुगोपाल यांनी भारत जोडो यात्रेच्या तयारीची पाहणी केली. राजस्थानमधील काँग्रेस ही एकजूट आहे. व भारत जोडो यात्रेला चांगला प्रतिसाद मिळावा यासाठी प्रयत्न करत आहे. व तो मिळणारच”, असे ट्विट जयराम रमेश यांनी केले आहे.