प्रद्युम्न हत्याप्रकरणातील आरोपी अशोक कुमारची प्रकृती चिंताजनक

30

सामना ऑनलाईन। नवी दिल्ली

रेयान शाळेतील प्रद्युम्न ठाकूर हत्याप्रकरणात अटकेत असलेला आरोपी बसवाहक अशोककुमार याला जामीनावर सोडण्यात आले आहे. मात्र घरी आल्यानंतर त्याची प्रकृती ढासळली. त्याला थंडी ताप भरला तसेच श्वास घेण्यास त्रास होऊ लागला आहे. तब्येत ढासळत असल्याचे पाहून त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तुरुंगात पोलिसांनी आपल्यावर गुन्हा कबूल करण्यासाठी थर्ड डिग्रीचा प्रयोग केल्याचा आरोप अशोककुमारने केला आहे.

प्रद्युम्नची हत्या केल्याच्या संशयावरून पोलिसांनी शाळेचा बसवाहक अशोकला अटक केली होती. ७६ दिवसांनंतर त्याची जामीनावर सुटका करण्यात आली. त्यानंतर एका हिंदी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्याने पोलिसांवर गंभीर आरोप केले होते. गुन्हा कबूल करावा यासाठी पोलिसांनी माझ्यावर थर्ड डीग्रीचा वापर केला. मला शॉक दिले. पण तरीही मी गुन्हा कबूल करण्यास तयार न झाल्याने माझ्यावर नशेचाही प्रयोग करण्यात आला. असे त्याने सांगितले. जेलमधून बाहेर आल्यानंतर काही तासांतच अशोककुमारची तब्येत बिघडल्याचे त्याच्या घरच्यांनी सांगितले. दरम्यान, अशोककुमारच्या उपचाराचा खर्च त्याच्या घरच्यांना परवडणारा नाही त्यामुळे ग्रामस्थांनी उपचारांसाठी निधी उभारण्यास सुरुवात केली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या