तव स्पर्श अमृताचा! ज्येष्ठ संगीतकार अशोक पत्कींच्या सांगीतिक कारकीर्दीला सलाम!

353

अत्यंत हळुवार भावगीते आणि मालिकांच्या शीर्षकगीतांना अमीट चाली देणारे तसेच जाहिरात विश्वात ‘जिंगल सम्राट’ म्हणून ओळखले जाणारे ज्येष्ठ संगीतकार अशोक पत्की यांच्या सांगीतिक कारकीर्दीला 50 वर्षे पूर्ण होत आहे. त्याच दिवशी त्यांच्या वयाची 78 वर्षे पूर्ण होत आहेत. हा दुहेरी योग साधून पत्की यांच्या गाजलेल्या गीतांवर आधारित ‘तव स्पर्श अमृताचा’ या खास कार्यक्रमाचे आयोजन रविवार, 25 ऑगस्टला माटुंग्याच्या यशवंत नाटय़गृहात रात्री 8.30 वाजता करण्यात आले आहे. यावेळी ज्येष्ठ संगीतकार पंडित हृदयनाथ मंगेशकर यांच्या हस्ते अशोक पत्की यांचा सत्कार करण्यात येणार आहे. शिवसेना नेते-खासदार संजय राऊत यांची यावेळी सन्माननीय उपस्थिती असणार आहे.

मेघमल्हार आणि स्वरसा यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. या कार्यक्रमात अशोक पत्की यांची गाजलेली चित्रपट गीते, भावगीते, जिंगल्स, टीव्ही मालिकांचे शीर्षकगीत आजचे यशस्वी गायक अनिरुद्ध जोशी, अमृता दहिवेलकर आणि माधुरी करमरकर सादर करणार आहेत. सूचत्रसंचालन स्मिता गवाणकर यांचे असून संगीत संयोजन प्रशांत लळीत यांचे आहे. कार्यक्रमाचे आयोजन मेघमल्हारचे संयोजक, तबलावादक स्वप्निल पंडीत यांनी केले आहे. या कार्यक्रमाला आशालता वाबगावकर, अभिनेत्री अलका कुबल-आठल्ये, निर्माता-दिग्दर्शक महेश टिळेकर, डॉ. जगन्नाथ हेगडे आदींची उपस्थिती लाभणार आहे.

हा कार्यक्रम रसिकांसाठी विनामूल्य असून कार्यक्रमाच्या प्रवेशिका शुक्रवार, 23 ऑगस्टपासून यशवंत नाटय़गृहात उपलब्ध असणार आहेत. अधिक माहितीसाठी संपर्क – 9869014524, 9769524488.

आपली प्रतिक्रिया द्या