जिवाची पर्वा न करता मुंबईकरांचे संरक्षण करणाऱ्या पोलिसांसाठी आमरस-पुरीचे जेवण, सराफ दाम्पत्याचे सर्वत्र कौतुक

4051

संकट कोणतंही असो त्याला पहिले मुंबई पोलीस सामोरे जातात. कोरोनासारख्या जीवघेण्या आजारामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीतही पोलीस जिवाची पर्वा न करता मुंबईकरांच्या संरक्षणासाठी सज्ज आहेत. या पोलिसांना धन्यवाद कसे द्यायचे असा विचार अभिनेते अशोक सराफ आणि त्यांच्या पत्नी निवेदिता सराफ यांच्या मनात घोळत होता. अखेर या दोघांनी घरदार सोडून सामान्य नागरिकांच्या सुरक्षेसाठी रस्त्यावर उतरणाऱ्या पोलिसांसाठी आमरस-पुरीचा बेत करावा असं ठरवलं.

अशोक सराफ आणि त्यांच्या पत्नी हे लोखंडवाला कॉम्प्लेक्समध्ये राहतात. हा भाग ओशिवरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत येतो. सराफ दाम्पत्याने ओशिवरा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दयानंद बांगर यांच्याशी संपर्क साधला आणि त्यांना सांगितले की त्यांच्या पोलीस ठाण्यातील सर्व कर्मचाऱ्यांसाठी आमरस-पुरीचे जेवण द्यायचे आहे. त्यांच्याकडून होकार येताच या पोलीस ठाण्यात असलेल्या कर्मचाऱ्यांसाठी जवळपास 180 आमरस-पुरीचे जेवण तयार करण्यात आले निवेदिता सराफ या हे जेवण घेऊन स्वत: पोलीस ठाण्यात गेल्या होत्या.

आमरस पुरीचा बेत पाहून हरखलेल्या काही पोलीस हवालदारांनी लॉकडाऊनमुळे आपल्याला यंदा आंब्याची चवच चाखायला मिळाली नसल्याचे म्हटले. त्यामुळे अचानक जेवणामध्ये आमरस-पुरी पाहून त्यांना आनंद झाला होता. सराफ कुटुंबाने पोलिसांना धन्यवाद देण्यासाठी आखलेल्या या बेताबद्दल अनेकांनी कौतुक केले आहे. अभिनेते अशोक सराफ आणि निवेदिता सराफ यांनी जो व्हिडीओ चित्रीत केला आहे त्यात त्यांनी म्हटलं आहे की ‘पोलिसांचे धन्यवाद मानण्यासाठी आमच्या सगळ्यांकडून आमरस-पुरी, ही भेट तुम्ही गो़ड मानून घ्या एवढीच इच्छा आहे.’

पोलिसांचे आभार मानण्यासाठी त्यांचे कौतुक करण्यासाठी अनेक बॉलीवूड कलाकारही पुढे सरसावले आहेत. अक्षय कुमार याने मुंबई पोलीस फाऊंडेशनला 2 कोटी रुपये दिले आहेत, तर पोलिसांना कोरोनाची लागण झालंय हे प्राथमिक पायरीवरच कळावं यासाठी मनगटावर बांधण्याचे विशेष बँड दिले आहेत. हृतिक रोशन याने पोलिसांसाठी हँड सॅनिटायझर्स दिले आहेत तर फरहान अखत्र याने 1000 पीपीई किट पोलिसांना दिले आहेत. दिग्दर्शक रोहित शेट्टी याने कर्तव्यावर असलेल्या पोलिसांच्या जेवणाची आणि राहण्याची सोय करण्यासाठी 8 हॉटेलमध्ये व्यवस्था करून दिली आहे. प्रत्येक जण आपापल्या परीने पोलीस, डॉक्टर्स आणि इतर कोविड योद्धांना मदत करताना दिसत आहे.

आपली प्रतिक्रिया द्या