अशोकमामा..

167

क्षितीज झारापकर, [email protected]

अशोक सराफ… मराठी चित्रपटसृष्टीतील अष्टपैलू अभिनेते… सातत्याने एकापेक्षा एक व्यक्तिरेखा चित्रपटांत सादर करून रंगभूमीवरही स्वत:चा ठसा उमटवून आता प्रदीर्घ कालावधीनंतर पुन्हा ‘शेंटिमेंटल’ या चित्रपटातून रसिकांच्या मनोरंजनाला सज्ज झाले आहेत… त्यानिमित्ताने अशोकमामांशी मारलेल्या गप्पा…

सध्या प्रत्येक आठवडय़ाला एकापेक्षा अधिक मराठी सिनेमे प्रदर्शित होण्याची प्रथाच सुरु झालेली आहे. त्यामुळे मराठी चित्रपटसृष्टीला चांगले दिवस आलेत असा सर्वसाधारण समज होतोय. पण खरं तर चित्रपटगृहात परिस्थिती खूपच वेगळी आहे. मराठी चित्रपटसृष्टीचा असाही एक काळ होता जेव्हा मराठी चित्रपट थिएटरच्या बारीवर धुमाकूळ घालायचा. आज मराठी चित्रसृष्टीच्या त्या सुवर्णकाळाबाबत आपण शेंटिमेंटल होणार आहोत. याचं कारण आहे की ज्या एका दिग्गज कलावंतामुळे मराठी सिनेमाने तो काळ पाहिला त्याच्या कारकीर्दीला २०१७मध्ये पन्नास वर्षे पूर्ण होताहेत. आपल्यात खरं तर आपल्या कलाकारांना हिंदीतल्या किंवा हॉलीवूडच्या मातब्बर कलाकारांच्या उपमा-उपाध्या देणं हे भूषणावह मानलं जातं. दस्तुरखुद्द राजा गोसावी यांना मराठीतला ‘डॅनी के.’ म्हटलं जायचं. पण ज्या कलाकाराच्या करीयरची पन्नाशी आपण इथे साजरी करणार आहोत त्याला कोणतीही उपाधी गरजेची नाही. आजवरच्या किमान दोन पिढय़ांमधले नावाजलेले मराठी नट त्याच्या अभिनयाच्या स्टाईलच्या अनुकरणामुळे त्याच्या नावाने ओळखले जाऊ लागले तो मराठी सिनेमाचा अनभिषिक्त सम्राट अशोक सराफ.

अशोक सराफ हे मराठी इंडस्ट्रीचे अशोकमामा आहेत आणि मामा हे नातं अत्यंत जिव्हाळ्याचं असतं. अशोकमामांच्या भन्नाट यशस्वी आणि नामांकित करियरबद्दल बरेच प्रश्न मनात होते. म्हणून त्यांची एक मनस्वी मुलाखत घेऊन इथे मांडत आहे.

तुमच्या चित्रपटांच्या मांदीयाळीत एक सुवर्णकाळ आला तो एका जोडगोळीचा. अशोक सराफलक्ष्मीकांत बेर्डे या दोन कलाकारांनी तिकीट बारी खणखणायला लावली. हे गणित कसं जमलं?

मला अशोक सराफ बनायचंय असं लक्ष्मीकांत म्हणायचा हे मला सुधीर जोशींनी सांगितलं. माझी नाटकातली कामं त्याने पाहिली होती. त्याचा प्रभाव त्याच्यावर होता. सुरुवातीला माझ्या आणि इतर काही चित्रपटांमध्ये त्याला लहान भूमिका मिळाल्या. त्यात त्याने ओळख मिळवली. आणि मग ‘धुमधडाका’ हा चित्रपट आला. १९८७ साली मला एक मोठा अपघात झाला आणि मी सहा-सात महिने बेडरेस्टमध्ये अडकलो. चालू असलेले चित्रपट अडकले आणि नवीन सुरु होणारे लांबले. त्यातल्या काही निर्मात्यांनी मग चित्रपट लक्ष्मीकांतला घेऊन सुरु केले आणि लक्ष्मीकांत बेर्डे स्टार झाला.

आपल्या अपघातामुळे लक्ष्मीकांतबरोबर तुम्ही नंतर इतके सिनेमे केलेत की दोघांची जोडी हे मराठी चित्रपट व्यवसायातील यशाचं गमक झालं ?

त्याला कारण लक्ष्मीकांत बेर्डे. त्याने नेहमीच मला योग्य रिस्पेक्ट दिला. आमच्यात वाद कधी झालेच नाहीत. लक्ष्मीकांतचा स्वभाव साफ, स्वच्छ, होता. स्पर्धा निकोप होती. चर्चा खूप व्हायची. नक्की काय करायचं हे ठरवलं जायचं. त्यामुळे एकमेकाला खाणं वगैरे प्रकार नव्हता आणि म्हणून आम्ही जवळजवळ ५०-६० चित्रपटांमध्ये एकत्र काम केलं.

रंगभूमीवरचे कलाकार चित्रपटात येण्याचा प्रवास खूप कठीण आणि लांबचा असतो असा समज आहे. तुम्ही नाटकातून सिनेमात कसे आलात?

अचानकपणे. १९७४ साली मला अचानक दादा कोंडकेंकडून बोलावणं आलं. मला आश्चर्यच वाटलं. कारण दादांनी मला पाहिलेलंही नव्हतं. कामही पाहिलं नव्हतं. पण त्यावेळचे दादांचे सहकारी अरुण कर्नाटकी, नंदकिशोर कलगुटकर यांनी माझं नाव दादांना सजेस्ट केलं होतं. जवळची इतकी माणसं शिफारस करताहेत तर याच्यात काहीतरी स्पार्क असणार म्हणून कदाचित आपल्याला बोलावलं असेल असं मला वाटलं. आम्ही भेटलो अणि दादांनी चक्क मला ‘पांडू हवालदार’मधला माझा संस्मरणीय रोल दिला. अशोक सराफ हा सिनेमानट जन्माला आला. नाटक थांबवलं नव्हतं. १९७५ साली राजा गोसावी आणि मी असलेलं एक धम्माल नाटक आलं ‘डार्लिंग-डार्लिंग’. त्यात आम्ही दोघांनी धुडगूस घातला होता. त्याकाळी त्या नाटकाचे ४०० प्रयोग झाले. त्यानंतर मग चित्रपट सुरुच झाले. एक काळ असा आला की मी जवळजवळ सलग एक वर्ष कोल्हापूरला राहिलो. त्याचा परिणाम नाटकांच्या प्रयोगांवर होऊ लागला आणि ‘हमिदाबाईची कोठी’ या विजयाबाईंबरोबरच्या नाटकानंतर १५ वर्षे मी नाटक केलं नाही.

आम्ही तुम्हाला पाहून या व्यवसायाकडे वळलो. पण तुमची सुरुवात कशी झाली?

खरं तर आपण कलाकार व्हावं हे लहानपणी ध्यानीमनीदेखिल नव्हतं. परंतु नाटक आणि कलेचं वातावरण मात्र घरात सदोदीत असायचं. माझे मामा हे निष्णात नाटय़निर्माते होते. त्यांची स्वतःची नाटक कंपनी होती. मी तेव्हा शाळेत किंवा गणेशोत्सवातून लहानसहान कामं करायचो. पण व्यवसाय म्हणून याकडे तेव्हा पहात नव्हतो. खरं तर मी या व्यवसायात यावं असं घरच्यांना अजिबात वाटत नव्हतं. त्यांचा विरोध होता. पण १९६७ साली मामांच्या ययाती आणि देवयानी या वि. वा. शिरवाडकरांच्या नाटकाचा दौरा होता आणि त्यात विदुषकाचं काम करणाऱया छोटू सावंतांना अचानक फेशियल पॅरॅलिसीस झाला. मी त्या नाटकाच्या तालमी पाहिल्या होत्या आणि प्रयोगात प्रॉम्पटींगही करायचो त्यामुळे मला अख्खं नाटक पाठ होतं. मामांनी मला बोलावलं आणि मी बेळगावात पहिल्यांदा व्यावसयिक नाटकात विदुषकाच्या भूमिकेत रंगमंचावर उभा राहिलो. इतकं झालं तरीही खुद्द मामांसकट घरचे कुणीही या व्यवसायासाठी तयार नव्हते. बेभरवशाचा धंदा म्हणून नको म्हणत होते. पण मग त्या वेळेस माझ्याबरोबर काम करणारी मोठमोठी मंडळी मा. दत्ताराम, रामदास कामत, लता कर्नाटकी या मंडळींनी समजूत घातली आणि मी व्यावसयिक कलाकार व्हायच्या मार्गी लागलो. नाटकं गाजू लागली. अशोक सराफ बरं काम करणारा नट आहे ही चर्चा सुरु झाली. पण तरीही भरवशाचा पाठिंबा हवा म्हणून मी स्टेट बँकेच्या हॉर्निमन सर्कल शाखेत नोकरी करत होतो.

मामांचं उत्तर ऐकून एकंदरीत मराठी कलेच्या क्षेत्राबाबतचं जनसामान्यांमधलं मत गेल्या पन्नास वर्षात अजिबात बदललेलं नाही हे जाणवलं. त्या काळात मराठी सांस्कृतिक चळवळ ही दक्षिण-मध्य मुंबईतचं केंद्रित होती. गिरगाव ते ग्रँट रोड या भागातून अनेक गुणवंत कलाकार मराठीला लाभले. त्यामुळे अशोकमामांच्या कलागुणांना ते राहात असलेल्या चिखलवडीतपर्यंत वाव मिळाला एवढंच.

मराठी कलाकार नेहमीच हिंदीत जाण्यासाठी आतूर असतात. तुम्ही संधी असूनही तिथे फार रमला नाहीत. असं का?

तिथे काहीतरी कॉन्टेन्ट असलेल्या भूमिका विरळच. एखादाच ‘सिंघम’, ‘यस बॉस’ किंवा ‘करण अर्जुन’सारखा रोल मिळतो. हिंदीत कॉमेडीच्या बाबतीत तोच तोचपणा येतो. मला तर एका हिंदी दिग्दर्शकाने एकदा म्हटलं की चलो कुछ कॉमेडी करते है. कुछ मजेदार करो… म्हणजे नक्की काय करो ? मला मग उबग येतो. हल्ली मी असं काहीतरी करण्यापेक्षा शांत घरी असतो.

आता शेंटिमेंटल करताय

बऱयाच दिवसांनी मला आवडलेली स्क्रिप्ट आहे ‘शेंटिमेंटल’. समीर पाटीलसारखा तरुण दिग्दर्शक आहे. सोबत राष्ट्रीय पुरस्कार विजेता कलाकार उपेंद्र लिमये आहे. प्रॉजेक्ट छान आहे आणि आजच्या प्रेक्षकांना तो बघायला आवडेल याची मला खात्री आहे. पोलिसांच्या जीवनावर प्रकाशझोत टाकतानाच त्यात छान गम्मत करण्याचा प्रयत्न आहे.

 

 

आपली प्रतिक्रिया द्या