आष्टी-नगर डेमू रेल्वेसेवा ठरणार ‘पांढरा हत्ती’; एका फेरीसाठी चार लाखांचा खर्च; रोज चौघांचाच प्रवास

नगर-बीड-परळी रेल्वे मार्गातील बहुचर्चित आष्टी-नगर डेमू रेल्वे आठवडाभरापूर्वी सुरू झाली. पण ही रेल्वेसेवा आता न परवडणारी ठरू पाहत आहे. 700 प्रवासीक्षमतेच्या या रेल्वेने रोज केवळ चारच प्रवासी प्रवास करतात व प्रत्येकी 40 रुपये तिकीट दराप्रमाणे रेल्वेला केवळ 160 रुपये मिळतात. दुसरीकडे या रेल्वेच्या एका फेरीसाठी तब्बल चार लाख रुपये खर्च होत असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे ही रेल्वेसेवा पांढरा हत्ती ठरण्याची भीती व्यक्त होत आहे.

‘मराठवाडय़ाची भाग्यविधाती’ व ‘बडय़ा नेत्यांचे बडे स्वप्न’ अशा जाहिराती आष्टी-नगर या रेल्वेच्या होत्या. नगरकरांच्या गेल्या दहा वर्षांपासून प्रचंड प्रवासी संख्येने मागणी असलेल्या नगर-पुणे शटल सर्व्हिस या मागणीकडे अक्षम्य दुर्लक्ष करून, जी आष्टी-नगर डेमू रेल्वे विद्वान रेल्वे मंत्रालयाने 23 सप्टेंबरला सुरू केली आहे, तिचे आर्थिक गणित सर्वांचेच डोळे पांढरे करणारे आहे. ही डेमू रेल्वे सुरू होऊन एक आठवडा झाला आहे.

याबाबत पुणे-नगर शटल रेल्वे सेवा सुरू करण्यासाठी पाठपुरावा करणारे जागरूक नागरिक मंचचे अध्यक्ष डॉ. सुहास मुळे यांनी नगर रेल्वे स्टेशनवरील तिकीट बुकिंग सुप्रिटेंडेंट उमेश प्रसाद यांना भेटून मागील चार दिवसांमध्ये नगर-आष्टी व आष्टी-नगर रेल्वेची किती तिकिटे विकली गेली, याची माहिती मिळवली असता धक्कादायक गोष्ट समोर आली आहे. मागील सातही दिवस आष्टी-नगर व नगर-आष्टी मिळून रोज तीन किंवा चार तिकिटांपेक्षा जास्त तिकिटे खपलेली नाहीत. 700 प्रवासी क्षमता असलेल्या या गाडीने रोज केवळ तीन किंवा चार लोकांनी प्रवास केला आहे. नगर-आष्टीचे तिकीट 40 रुपये असून, रेल्वेला त्यातून दररोज केवळ 160 रुपये व मागील सात दिवसांत अंदाजे 1 हजार 200 रुपये उत्पन्न मिळाले आहे.

रेल्वेच्या डिझेल इंजिनची किंमत बारा कोटी रुपये आहे. प्रत्येक डब्याची किंमत 45 लाख रुपये आहे. म्हणजे ही डेमू रेल्वे साडेसोळा कोटी रुपयांची आहे. शिवाय नगर-आष्टी रेल्वे मार्गासाठी साडेनऊ हजार कोटी रुपये खर्च झाले आहेत. नगरहून आष्टीला जायला या रेल्वेला 42 हजार रुपयांचे 425 लिटर डिझेल लागते. शिवाय गार्ड आणि ड्रायव्हर आणि इतर स्टेशन नेटवर्क यांचा सुमारे 20 हजार रुपये दिवसाचा खर्च आहे. म्हणजे कोटय़वधी रुपयांची रेल्वे आणि कोटय़वधी रुपयांचा रेल्वे मार्ग, याचा खर्च, व्याज धरले नाही, तरी दररोज केवळ तीन-चार प्रवासी नेण्यासाठी आणि आणण्यासाठी ही 700 प्रवासी क्षमता असलेली रेल्वे मागील आठवडय़ापासून दररोज तब्बल चार लाख रुपये खर्च करीत आहे. मागील आठवडय़ात आतापर्यंत 28 लाख रुपयांचा धूर निघालेला असून, त्यापोटी रेल्वेला आजपर्यंत केवळ 1 हजार 200 रुपये मिळाले आहेत, असे डॉ. मुळे यांचे म्हणणे आहे.