मूर्तिमंत गणेश

>> आशुतोष बापट

अत्यंत लोकप्रिय आणि अतिशय लाडके असे दैवत असलेल्या गणेशाची रूपे खरं तर प्रचंड संख्येने आहेत. निरनिराळ्या रूपांत तो भक्तांना दर्शन देत असतो. त्याची नावे आणि रूपे वेगवेगळी असली तरी भक्तांचे रक्षण हेच त्याचे मोठे कार्य. मग तो कुठल्या रूपात आहे यापेक्षाही तो आपल्या जवळ आहे याची जाणीव भक्तांना जास्त सुखावह आहे. या प्रेमापोटीच गणेशाच्या विविध प्रकारच्या मूर्ती घडवल्या गेल्या असणार, जेणेकरून त्याची निरनिराळी रूपे भक्तांच्या सतत समोर राहावीत अशीच त्या शिल्पकारांची भावना झाली आणि म्हणूनच त्यांनी आपल्या कलेद्वारे मूर्तिमंत गणेश आपल्यासमोर विविध रूपांत उभा केला.

सर्व कलांचे अधिपत्य गणपतीकडे असल्याचे समजले जाऊ लागले. नृत्य या कलेत तो निपुण आहे हे सांगण्यासाठी नृत्य गणेशाच्या अप्रतिम प्रतिमा मंदिरांवर कोरल्या जाऊ लागल्या. महाराष्ट्रात गडचिरोली जिह्यात असलेल्या मार्कंडा देवळावर अशाच नृत्यगणेशाची अतिशय देखणी मूर्ती आहे. अतिशय देखणी अशी ही मूर्ती आठ हातांची आहे. वरच्या दोन हातांत नाग धरलेला असून उरलेल्या हातात परशू, दंत, कमळ आणि बीजपूरक दिसते. उजवा एक हात नृत्यमुद्रेत आहे. गळ्यात सर्पाचे यज्ञोपवीत परिधान केलेला देव तल्लीन होऊन नृत्य करताना दिसतो आहे. पायाशी दोन वादक दिसतात. इतकी देखणी मूर्ती क्वचितच कुठे बघायला मिळेल.

देवा तूची गणेशु, सकळ मति प्रकाशु
म्हणे निवृत्ती दासु अवधारिजो जी

वक्रतुंड, लंबोदर, गणाधिपती अशा विविध नावांनी अत्यंत लोकप्रिय असलेल्या गणपतीला ज्ञानदेवांनी केलेले हे आवाहन. त्याचे सुखकर्ता, विघ्नहर्ता हे स्वरूप आणि त्याचे मनामनात असलेले स्थान पाहता कुठलीही गोष्ट सुरू करताना सर्वात आधी गणपतीची पूजा करणे हे आपल्या आयुष्याचे एक अविभाज्य अंग झालेले आहे. या देवतेच्या प्राचीन अस्तित्वाचे तुटक तुटक संदर्भ साहित्यातून सापडतात. तरीही ही देवता तशी नंतरच्या काळात प्रकट झालेली दिसते, परंतु असे असले तरीही लोकप्रियतेच्या बाबतीत इतर कुठल्याही देवतांपेक्षा गणपती हा सर्वाधिक लोकप्रिय असलेला देव आहे. त्यामुळेच की काय ‘बाप्पा’ हे प्रेमळ नामाभिधान फक्त याच देवाला प्राप्त झालेले दिसते.
गणपती या देवतेच्या उदयाचा प्रवास हा हत्तीमुखी देवता, यक्ष, विघ्नकर्ता ते विघ्नहर्ता असा खूप मोठा आणि अर्थातच रंजक असा आहे, पण तो एक वेगळा विषय झाला. गणपती या देवतेच्या मूर्ती आपल्याला गुप्त काळापासून प्रकर्षाने दिसायला लागतात. स्वतंत्र मूर्ती निर्माण होण्याआधी ही देवता नाण्यांवर अंकित झालेली पाहायला मिळते. बहुसंख्य इंडो-ग्रीक राजांच्या नाण्यांवर हत्तीचे चित्र दिसून येते. त्या प्रदेशात हत्ती पवित्र प्राणी मानला जात असावा आणि नाणी सामान्य जनतेसाठी असल्यामुळे हत्तीचे चित्र दाखवले असावे असे तज्ञांचे मत आहे. हत्ती या पवित्र प्राण्याचा देवत्वाकडे जाणारा प्रवास असा सुरू झालेला असावा. ग्रीकांनी मानव आणि घोडा यांचे केलेले मिश्ररूप ‘सेंटॉर’ या नावाने प्रसिद्ध आहे. तसेच त्यांनी हत्तीला मानवी रूप दिलेले दिसते इ.स. पूर्व 50 च्या सुमारास इंडो-ग्रीक राजा हर्मेस याच्या नाण्यावर.

पुढे पुराणकाळात गणेशाच्या जन्माच्या विविध कथा दिलेल्या आहेत. त्यातली पार्वतीने अंगच्या मळापासून मुलगा निर्माण करणे, मग शिवाकडून त्याचा शिरच्छेद, नंतर हत्तीचे डोके आणून त्याला जोडणे ही कथा तर सर्वश्रुत झालेली आहे. पवित्र प्राण्यापासून ते त्याला देवत्व प्राप्त होण्याचा गणपतीचा प्रवास हा असा रंजक पद्धतीने पुढे सरकत जातो आणि पुढे ही देवता मूर्तींमधून प्रकट झालेली दिसू लागते.
गुप्त काळात गणेशाच्या मूर्ती मंदिरात बसवायला सुरुवात झालेली दिसते. भुमरा, देवगड या ठिकाणी गणेशाच्या मूर्ती दिसू लागतात. तो आता दोन हातांचा यक्ष नसून रीतसर चार हातांचा देव झालेला प्रकर्षाने जाणवतो. इथे गणपतीला हत्तीचे नैसर्गिक डोके आहे. त्यावर मुकुट किंवा इतर अलंकार दिसत नाहीत. जवळ जवळ सगळेच गणपती डाव्या सोंडेचे आहेत. उदयगिरी इथला गणपती जरी दोन हातांचा असला तरीसुद्धा आता चार हातांच्या मूर्ती दिसू लागतात. याच काळात अफगाणिस्तानमध्ये दोन गणेश प्रतिमा मिळालेल्या आहेत.

त्यापैकी एकीवर शाही राजा खिंगल याच्या वेळचा लेख लिहिलेला दिसतो. या प्रतिमेला महाविनायक असे नाव दिलेले आहे. हा दोन हातांचा असून सोंड डाव्या बाजूला वळलेली आहे. याचे हात मात्र भग्न झालेले आहेत. त्यानंतर चालुक्यांच्या बदामी इथल्या शैव लेणीत आपल्याला गणपतीचे दर्शन होते. इथेपण देव दोनच हातांचा आहे. उजवा हात अभयमुद्रेत असल्यासारखा आहे, तर डाव्या हातात लाडू असून त्यावर त्याची सोंड टेकवलेली आहे. गळ्यात माळा असून त्याच्या पायाशी दोन गण नाचताना दिसतात. त्याचे वाहन उंदीर मात्र इथे दिसत नाही. त्यानंतर निर्माण झालेल्या वेरूळ इथल्या लेणीत आपल्याला गणेशाचे जे दर्शन होते ते निरनिराळ्या रूपात होते. रामेश्वर लेणीत तो शिवपार्वतीच्या विवाहप्रसंगी उपस्थित असलेला दिसतो. इथे तो शिवाचा गण म्हणून येतो असे अभ्यासक सांगतात. नंतरच्या कैलास लेणीत आपल्याला गणेशाचे दर्शन अगदी प्रवेश केल्या केल्याच होते. कैलास लेणीत प्रवेश केल्यावर लगेच डावीकडे आपल्याला तुंदिलतनू गणपती दर्शन देतो. याच लेणीत वरच्या मजल्यावर आपण जेव्हा मंदिराला प्रदक्षिणा घालतो तेव्हा त्या प्रदक्षिणा मार्गावर पुन्हा एकदा बाप्पा दिसतात, तर कैलास लेणीत असलेल्या यज्ञशाळेत गणपती हा सप्तमातृकांसोबत शिल्पांकित केलेला आहे.

गुप्तोत्तर काळात तांत्रिक पंथांचा उगम झाला. गणेशाला त्यातही स्थान मिळाले. तांत्रिक परंपरेत मुळात शक्तीची, शक्ती देवतांची उपासना होते. तांत्रिक विधी, आचार यांनी युक्त असा तंत्रमार्ग इथेही अनुसरला जाऊ लागला. पंच मकार हे त्यांचे अजून एक वैशिष्टय़. बौद्ध धर्मातसुद्धा पुढे या तंत्रमार्गाने प्रवेश केलेला दिसतो. याच तांत्रिक परंपरेत काही निराळ्या गणेशमूर्ती निर्माण झालेल्या दिसतात. त्यातली एक म्हणजे उच्छिष्ट गणेशाची मूर्ती. उच्छिष्ट गणपतीचे रूप हे तांत्रिकांच्या वामाचारी पंथाचे रूप आहे. त्यात गणेश आणि त्याची शक्ती क्रीडा करताना शिल्पित करतात. मराठवाडय़ात असलेल्या औंढय़ा नागनाथ मंदिरावर अशीच एक उच्छिष्ट गणेशाची मूर्ती त्याच्या शक्तीसह शिल्पांकित केलेली पाहायला मिळते. देवाला अधिक प्रबळ, शक्तिशाली दाखवण्यासाठी त्याच्या हातांची संख्या वाढत गेली. गणपतीच्या बाबतीत त्याच्या तोंडाची संख्या वाढत गेल्याचे दिसते. त्या मूर्तींना मग महागणपती, हेरंब अशी नवे प्राप्त झालेली दिसतात.
गणपतीची लोकप्रियता हिंदुस्थानच्या बाहेरही गेलेली दिसते. चीन, जपान, थायलंड, इंडोनेशिया, कंबोडिया या देशांतसुद्धा गणपतीच्या मूर्ती मिळालेल्या आहेत. याचाच अर्थ तिथपर्यंत या गणरायाची कीर्ती पोहोचलेली होती आणि त्याची उपासनासुद्धा होत होती. कंबोडियात थायलंड देशाच्या सीमेला लागून एका डोंगरावर शिखरेश्वर मंदिर आहे. त्याला स्थानिक भाषेत प्रे विहार असं म्हणतात.

या मंदिरात गणपतीची मूर्ती दिसते. तिथले लोक त्याला बुद्धाचे एक रूप म्हणून पुजतात, परंतु ती गणपतीची मूर्ती आहे. उजव्या हातात मुळा असावा, तर डाव्या हातात प्रसादपात्र असून त्यावर सोंड टेकवलेली आहे. डोक्यावर तिथल्या पद्धतीचा मुकुट दिसतो. हिंदुस्थानपासून इतक्या लांब आपल्या लाडक्या बाप्पाची मूर्ती पाहून खूपच छान वाटते. बौद्ध धर्मात तसाही गणपती हा यक्ष म्हणूनच येतो, परंतु जैन धर्मात तसे नाही. तिथे गणपतीला विघ्नहर्ता रूपात स्थान मिळाले. जैन पंडित वर्धमान सुरी यांच्या ‘आचार-दिनकर’ या सन 1412 मध्ये लिहिलेल्या ग्रंथावरून हे समजून येते. प्रत्येक कार्याच्या सुरुवातीला गणेशाला आवाहन करावे असे जैन धर्मात सांगितले आहे. हेमचंद्राच्या ‘अभिधान चिंतामणी’ या ग्रंथात गणेशाची विविध नवे दिलेली आहेत. जैन ग्रंथात गणेशाची हेरंब, विघ्नेश, विनायक, एकदंत, लंबोदर अशी नावे येतात. ‘आचार-दिनकर’ या ग्रंथात ‘गणपती प्रतिष्ठा’ हा अध्याय असून त्यात गणपतीचे मूर्तिविधान सांगितलेले आहे. जैन धर्मीय गणेशाची मूर्ती नाशिक जिल्ह्यातील अंकाई-टंकाई इथल्या लेणीत कोरलेली दिसते.

[email protected]

आपली प्रतिक्रिया द्या