पाऊलखुणा- चोलांचे देखणे स्थापत्य

>> आशुतोष बापट

पंपहारेश्वर मंदिर हे चोल स्थापत्याचे सर्वांगसुंदर रूप. त्यावर असलेले मूर्तिकाम, त्याचे ते भव्यदिव्य शिखर आणि या मंदिराशी निगडित असलेल्या कथा यामुळे हे मंदिर चोल स्थापत्यात खूप मोलाची भर घालते.

तंजावरचे बृहदीश्वर, गंगैकाsंडचोलपुरम इथलेही बृहदीश्वर आणि दारासुरम इथले ऐरावतेश्वर मंदिर ही तीन मंदिरे म्हणजे ग्रेटर चोल मंदिरे म्हणून ओळखली जातात. चोळ स्थापत्याचा मेरुमणी असे या मंदिरांना म्हटले जाते. याच मंदिरांच्या पंक्तीमध्ये अजून एक चोल मंदिर येते आणि ते म्हणजे तिरुभुवनम इथले पंपहारेश्वर मंदिर. याचे नाव काहीसे वेगळे वाटते. ‘पंप-हर-ईश्वर’ अशी याची पह्ड करता येते. पंप किंवा पंपवात म्हणजे इंग्रजीत ज्याला पार्किन्सन म्हणतात, त्या रोगाचे हरण करणारा ईश्वर तो पंपहारेश्वर. हे शिवमंदिर आहे. इथल्या महादेवाला हे असे नाव पडण्यामागे एक कथा कारणीभूत आहे. वरगुण पांडय़ नावाचा राजा हा ब्रह्मराक्षसाने पछाडलेला होता. राजाच्या अंगाचा भीतीमुळे सतत थरकाप व्हायचा. त्याने इथे येऊन महादेवाची आराधना केली आणि तो पंपमुक्त झाला, अशी आख्यायिका आहे. कदाचित त्या राजाला त्या काळी पार्किन्सन्ससारखा आजार म्हणजेच पंपवात झालेला असेल आणि तो राजा इथे येऊन त्याचा तो पंपवात बरा झाला असेल आणि तेव्हापासून हा देव मात्र पंपहारेश्वर म्हणून प्रसिद्ध झाला. आश्चर्याची बाब म्हणजे आजही पंपवात, अपस्मारसारख्या मेंदूच्या आजारांनी त्रस्त लोक या ठिकाणी मुद्दाम दर्शनाला येतात आणि या पंपहारेश्वराच्या दर्शनाने त्यांचा आजार बरा होतो अशी भाविकांची दृढ श्रद्धा आहे.

तंजावर जिह्यातल्या मईलादुरतुरई-पुंभकोणम मार्गावर असलेल्या ‘तिरुभुवनम’ या गावी हे मंदिर वसलेले आहे. इ.स.च्या 12 व्या शतकात चोल साम्राज्यातील शेवटचा पराक्रमी राजा कुलोत्तुंग चोल तिसरा याने आपल्या उत्तर हिंदुस्थानवरील विजयाची स्मृती म्हणून हे मंदिर बांधले. मंदिराच्या दक्षिण भिंतीवर असलेल्या शिलालेखातून हे स्पष्ट झाले. शिलालेखात राजाच्या नावाचा उल्लेख ‘कुलोत्तुंग चोलदेव’ इतकाच आलेला आहे. इतर अनेक गोष्टींचा विचार करून अभ्यासकांचे हे मत पडले की, हा कुलोत्तुंग चोलदेव म्हणजे इ. स. 1176 साली राज्यावर असलेला कुलोत्तुंग चोळ तिसरा हाच होय. इतर तीन चोल मंदिरांप्रमाणे हे मंदिरसुद्धा ग्रॅनाईट दगडात बांधलेले आहे. गोपुरापेक्षा उंच असे मंदिराचे शिखर आणि त्यावर बसवलेली देखणी स्तुपी हे चोल स्थापत्याचे वैशिष्टय़ इथेसुद्धा पाहायला मिळते.

मंदिराचे स्थापत्य अत्यंत देखणे आहे. आधीच सांगितल्याप्रमाणे हे मंदिर बघताना वारंवार दारासुरम इथल्या ऐरावतेश्वर मंदिराचा भास होतो, इतके या दोन मंदिरांचे स्थापत्य एकसारखे आहे. मंदिराचे प्रवेशद्वार हे उत्तुंग अशा राजगोपुराने सजलेले आहे. हे गोपुर पाच थरांचे आहे. याचा खालचा भाग ग्रॅनाईटचा तर त्याच्या वरचा भाग हा विटा आणि चुन्यात बांधलेला आहे. गोपुराच्या दरवाजावर दोन्ही बाजूंवर विविध शिल्पे कोरलेली आहेत. गोपुरातून आत गेल्यावर स्तंभ आणि बळीपीठ दिसते. तिथेच पुढे नंदी मंडप आणि त्यात नंदीची मूर्ती ठेवलेली आहे. तामीळनाडूमधल्या इतर मंदिरांसारखे इथे पण दोन भव्य सभा मंडप आहेत. अनेक खांबांनी युक्त असे हे सभा मंडप खूप प्रशस्त आणि सुंदर दिसतात. इथून पुढे असलेल्या गाभाऱयात शिवलिंग असून त्याची पंपहारेश्वर म्हणून पूजा केली जाते. या मंदिराचे ‘विमान’ म्हणजेच गाभाऱयावर असलेले शिखर हे चांगले उंच केलेले आहे.

मंदिर परिसर विस्तीर्ण असून त्याच्या तीनही बाजूंनी ओवऱया केलेल्या आहेत. मंदिराच्या प्रशस्त आवारात देवीचे आणि चंडिकेश्वराचे स्वतंत्र मंदिर आहे. गर्भगृहाबाहेरील देवकोष्ठांमधून नटराज शिव, लिंगोद्भव शिव, दुर्गा आणि भिक्षाटन शिव यांच्या मूर्ती आहेत. तसेच ज्या ओवऱया आहेत त्यांच्या पायाशी असलेल्या भागातसुद्धा विविध शिल्पांकन केलेले दिसते. याच मंदिरात शरभेश्वराचे अजून एक मंदिर आहे. शरभ हा शिवाचा रौद्र अवतार होय. शरभ म्हणजे पंख असलेला सिंह अशी पौराणिक समजूत आहे. इथे असलेल्या शरभेश्वर मंदिरातील श्री शरभाची मूर्ती उत्कृष्ट कलात्मक काम असलेली धातूची बनवलेली आहे. या मंदिरालासुद्धा सुंदर प्रवेशद्वार, त्याच्या बाजूला दोन द्वारपाल तसेच आत गेल्यावर अनेक खांबांनीयुक्त असा सभा मंडप आणि काहीशा उंचावर असलेला गाभारा आणि गाभाऱयात शरभेश्वराची धातुमूर्ती असे सगळे साग्रसंगीत काम केलेले दिसते. हे मंदिर पुरातत्त्व खात्याच्या अखत्यारीत येत नाही. त्यामुळे इथे मंदिराचे शिखर आणि बाह्य भिंती भरपूर रंगवलेल्या आहेत. आता हे चांगलं का वाईट हे ज्याचं त्यानं ठरवावं. एक गोष्ट मात्र लक्षात घ्यायला हवी की, आज जरी आपल्याला काळ्या दगडातली मंदिरे बघायला सुंदर दिसत असली तरी पूर्वीच्या काळी ही सगळी मंदिरे रंगवलेली असत. अनेक मंदिरांवर, तिथे असलेल्या शिल्पांवर आजही आपल्याला तत्कालीन रंगाचे अवशेष दिसतात. पुंभकोणमच्या भेटीदरम्यान पंपहारेश्वर मंदिराचे दर्शन घेणे त्यामुळेच अपरिहार्य आहे.

[email protected]