नोकऱ्यांचे ट्विट आर. अश्विनच्या अंगाशी, टीकेनंतर ‘फिरकी’

58

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

हिंदुस्थानी क्रिकेट संघाचा फिरकी गोलंदाज आर. अश्वीन एका ट्विचमुळे अडचणीत आला आहे. तामिळनाडूतील राजकीय परिस्थितीशी साम्य राखणारे एक ट्विट केल्याने त्याची फिरकी त्याच्याच अंगाशी आल्याचं पाहायला मिळाले. त्यामुळे वातावरण तापले असून त्या ट्विटचा राजकारणाशी काही संबंध नाही, असे स्पष्टीकरण अश्विनला द्यावे लागले.

‘राज्यात तरुणांसाठी लवकरच २३४ नोकऱ्या निर्माण होणार आहेत’, असे ट्विट अश्विनने केले. त्यानंतर अवघ्या दोन तासांत या ट्विटला २९०० रिट्विट आणि ५३०० लाईक्स मिळाल्या. अश्विनच्या या ट्विटमुळे सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या. खरे तर तामिळनाडूमध्ये विधानसभेच्या २३४ जागा आहेत आणि ओ. पन्नीरसेल्वम यांचा राजीनामा घेऊन मग जयललिता याच्या निकटवर्तीय शशिकला या मुख्यमंत्री होणार आहेत. अशा वेळीच २३४ नोकऱ्या लवकरच निर्माण होतील या अश्वीनच्या ट्विटचा अर्थ राजकीय घटनेशी जोडला गेला आणि क्रिकेटच्या मैदानात इतरांना आपल्या फिरकीने फसवणार अश्विन स्वत:च फसला. अखेर ‘मित्रांनो, शांत व्हा! या नोकरीच्या ट्विटचा राजकारणाशी संबंध नाही’, असे अश्विनला ट्विटकरून सांगावे लागले.

दरम्यान, अश्विनचे मॅनेजर वी. बालाजी यांनी या ट्विटचा राजकारणाशी संबंध नसल्याचे स्पष्ट केले. २३४ हा आकडा तामीळनाडूमध्ये महत्वाचा मानला जातो. त्यामुळे अश्विन आणि क्रिकेट संस्था काही नोकऱ्या तरुणांना देणार आहे, त्यासाठी २३४ हा आकडा निवडण्यात आला, अन्य कशाशी त्याचा संबंध नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.

आपली प्रतिक्रिया द्या