अश्विनी बिद्रे बेपत्ता प्रकरण, कुरुंदकरांची कोठडीत गळपटलेली रात्र

61

सामना ऑनलाईन । नवी मुंबई

सहाय्यक पोलीस निरीक्षक अश्विनी गोरे-बिद्रे बेपत्ताप्रकरणी अटक करण्यात आलेले ठाणे ग्रामीणचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अभय कुरुंदकर यांची रवानगी पोलीस कोठडीत होताच ते पुरते गळपटले. आरोपींना दिले जाणारे जेवणच त्यांना देण्यात आले. पण हा ‘भत्ता’ त्यांच्या गळी उतरला नाही. रात्रभर ते अस्वस्थ होते. मध्यरात्री येरझाऱ्या घालत होते. एरवी आरोपींना कोठडीत डांबणाऱ्या कुरुंदकरांची कोठडीतल्या मुक्कामाने साफ तंतरली होती.

कळंबोली पोलीस ठाण्यात सहाय्यक पोलीस निरीक्षक म्हणून बदली होऊन आलेल्या अश्विनी बिद्रे गेल्या दीड वर्षांपासून बेपत्ता आहेत. त्यांची हत्या झाल्याचा आरोप करीत कुटुंबीयांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर या प्रकरणाचे धागेदोरे शोधून काढत कळंबोली पोलीस ठाण्याचे एसीपी प्रकाश निलेवाड यांनी ठाणे ग्रामीणचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अभय कुरुंदकर यांना गुरुवारी रात्री अटक केली. शुक्रवारी त्यांना न्यायालयात हजर केल्यानंतर सात दिवसांची पोलीस कोठडी ठोठावण्यात आली. त्यानंतर कुरुंदकर यांची रवानगी कळंबोलीच्या लॉकअपमध्ये करण्यात आली.

आरोपींना देण्यात येणारे डाळ-रोटीचे जेवण त्यांना देण्यात आले. कुरुंदकर यांनी ते कसेबसे संपवले. त्यानंतर अख्खी रात्र ते अस्वस्थ होते, येरझाऱयाही घालत होते. डासांच्या चाव्यानेही त्यांची झोप उडवून टाकली होती.

चोर, चीटर, दरोडेखोर म्हणाले, ‘तुम पुलीस हो क्या?..’
कळंबोली पोलीस ठाण्यात एकच कोठडी आहे. या कोठडीत चोर, चीटर आणि दरोडेखोरांना डांबण्यात आले आहे. त्यांच्यासोबतच अभय कुरुंदकर यांना ठेवण्यात आले आहे. कोठडीत डांबताच आधीच आत असलेल्या आरोपींनी त्यांना ‘तुम पुलीस हो क्या..’ असा सवाल केल्याचे कळते.

चौकशीसाठी बाहेर काढले
सहाय्यक पोलीस निरीक्षक अश्विनी बिद्रे बेपत्ता प्रकरणाचे तपास अधिकारी सहाय्यक पोलीस आयुक्त प्रकाश निलेवाड हे दोन दिवस रजेवर असल्याने या प्रकरणाचा तपास सहाय्यक आयुक्त राजकुमार चाफेकर यांच्याकडे देण्यात आला आहे. अभय कुरुंदकर यांना आज चौकशीसाठी कोठडीतून बाहेर काढण्यात आले. अज्ञातस्थळी सुमारे पाच तास त्यांची कसून चौकशी करण्यात आली.

कुरुंदकरांच्या अडचणी वाढल्या
सहाय्यक पोलीस निरीक्षक अश्विनी बिद्रे यांना अभय कुरुंदकर यांनी मारहाण केल्याच्या व्हिडीओपाठोपाठ आणखी एक व्हिडीओ आज सोशल मीडियामध्ये व्हायरल झाला. त्यामुळे अभय कुरुंदकर यांच्या अडचणी वाढल्या आहेत. मारहाणीचा व्हिडीओ हा मध्यरात्रीचा आहे, तर नव्याने व्हायरल झालेला व्हिडीओ हा त्याच दिवशी सायंकाळी पाचचा आहे.

आपली प्रतिक्रिया द्या