Asia Cup 2023 – बांगलादेशचा सुखद शेवट, गिलचे झुंजार शतक व्यर्थ

संपूर्ण स्पर्धेत विशेष काही करू न शकलेल्या बांगलादेशने आशिया चषकाच्या संभाव्य विजेत्या हिंदुस्थानचा 6 धावांनी पराभव करत आपला सुखद शेवट केला. तब्बल 44 षटके झुंजार खेळ करणाऱ्या शुबमन गिलची 133 चेंडूंतील 121 धावांची खेळी अपयशी ठरली. आज हिंदुस्थानच्या एकाही फलंदाजाने शुबमनला साथ दिली नाही. अक्षर पटेलने शेवटच्या क्षणी हिंदुस्थानच्या विजयाच्या आशा पल्लवित केल्या होत्या, पण तोसुद्धा अपयशी ठरला आणि हिंदुस्थानचा डाव 249 धावांवर संपला.

हिंदुस्थानने आधीच अंतिम फेरीत धडक मारल्यामुळे आजचा सामना सराव सामना होता. त्यामुळे नाणेफेक जिंकल्यानंतर धावांचा पाठलाग करता यावा म्हणून हिंदुस्थानने प्रथम क्षेत्ररक्षण घेतले आणि संघात पाच बदल करत बाकावरच्या खेळाडूंना खेळण्याची संधी दिली. विराट कोहली, हार्दिक पंडय़ा, कुलदीप यादव, जसप्रीत बुमरा आणि मोहम्मद सिराज यांना विश्रांती देत सूर्यकुमार यादव, शार्दुल ठाकूर, मोहम्मद शमी, प्रसिध कृष्णा आणि तिलक वर्माला वन डे पदार्पणाची संधी दिली.

बांगलादेशच्या 266 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना आज हिंदुस्थानी फलंदाजांनी माती खाल्ली. कर्णधार रोहित शर्मा भोपळा न फोडताच बाद झाला आणि हिंदुस्थानी डावाला घरघर लागली. शुबमन गिल एका बाजूला लढवय्यासारखा लढला, पण दुसऱ्या बाजूने तिलक वर्मा (5), के. एल. राहुल (19), इशान किशन (5) यांनी घोर निराशा केली. त्यामुळे शंभरीतच 4 विकेट गेल्या होत्या. तरीही गिलने सूर्यकुमार यादव आणि रवींद्र जाडेजासह छोटी भागी करत संघाला 170 पर्यंत नेले. मात्र त्यानंतरही गिलने आपले शतक झळकावत हिंदुस्थानच्या विजयाच्या अपेक्षा वाढवल्या. पण तो बाद होताच हिंदुस्थानवर पुन्हा पराभवाचे सावट पसरले. तेव्हा अक्षर पटेलने 42 धावांची फटकेबाज खेळी करत विजयाच्या आशा पल्लवित केल्या. पण तोसुद्धा 9 चेंडूंत 12 धावा हव्या असताना बाद झाला आणि हिंदुस्थानचा पराभव निश्चित झाला. अखेर हिंदुस्थानचा डाव 259 धावांवर संपुष्टात आला.

त्याआधी बांगलादेशने कर्णधार शाकिब अल हसनच्या झुंजार 80, तौहिद हृदॉय, नसूम अहमद (44) आणि मेहदी हसनच्या नाबाद 29 धावामुंळे 50 षटकांत 8 बाद 265 धावा केल्या. हिंदुस्थानकडून संधी मिळालेल्या शार्दुलने 3 तर शमीने 2 विकेट टिपल्या.

झुंजार शतक व्यर्थ

गिलने आज आपल्या वन डे कारकीर्दीतील पाचवे शतक ठोकले. तसेच हे या वर्षातले चौथे शतक होय. गिलचे शतक पहिल्यांदाच अपयशी ठरले. या आधीच्या चारही शतकी खेळींनी हिंदुस्थानला विजय मिळवून दिला होता.