
परवा एकटय़ा दुनिथ वेल्लालागेने हिंदुस्थानला झुंजवले होते, तर काल पाकिस्तानविरुद्धच्या उपांत्य सामन्याला साजेशा झालेल्या लढतीत शेवटच्या चेंडूवर हरवले. श्रीलंकेचा हा थरारक विजय हिंदुस्थानी संघासाठी एकप्रकारे इशाराच आहे, जो त्यांनी जिंकता जिंकता हिंदुस्थानी संघाला केला. श्रीलंकेला दुबळा किंवा बेभरवशाचा संघ मानण्याची चूक कुणीही करू नये. आशिया चषक गेल्यावेळी आमचा होता आणि यंदाही आम्ही जिंकू शकतो, असे स्पष्ट संकेतच श्रीलंकेने दिले आहेत.
पाकिस्तानच्या 253 धावांचा पाठलाग करताना कुसल मेंडिस आणि सदीरा विक्रमासिंघेने तिसऱ्या विकेटसाठी 100 धावांची जबरदस्त भागी रचून श्रीलंकेचा विजय सोप्पा केला होता. पण ही जोडी फुटल्यानंतर श्रीलंकेच्या डावाला दृष्ट लागली आणि एकतर्फी सामना नाटय़मय वळणावर धावू लागला. शतकाच्या उंबरठय़ावर असलेल्या कुसल मेंडिस बाद झाला आणि श्रीलंका आणखीनच अडचणीत सापडली. त्यांना 7 षटकांत केवळ 43 धावा हव्या होत्या. एका बाजूला असलंका पाकिस्तानी गोलंदाजांना भिडत होता.
शेवटच्या 2 षटकांत अवघ्या 13 धावांची गरज होती आणि श्रीलंकेच्या हातात अर्धा संघ होता. पण शाहीन आफ्रिदीच्या या षटकाने पूर्ण सामनाच फिरवला. त्याने 4 धावा देत धनंजया आणि दुनिथ वेल्लालागेची विकेट काढत पाकिस्तानच्या विजयाच्या आशा उंचावल्या. शेवटच्या षटकात लंकेला 9 धावांची गरज होती आणि पहिल्या चार चेंडूंत त्यांना दोन धावा काढता आल्या. त्यामुळे दोन चेंडूंत सहा धावा काढायच्या होत्या. पण जमान खानच्या वेगवान चेंडूला अलगद सीमारेषेवर मारून असलंकाने पुन्हा लंकेला विजयासमीप आणले. या चौकारामुळे लंकेत चैतन्य आले आणि शेवटच्या चेंडूवर असलंकाने सहज दोन धावा काढून संघाच्या अंतिम फेरीवर शिक्का मारला.
आता हाच संघ हिंदुस्थानविरुद्धही खेळणार असल्यामुळे आशियाचा डॉन कोण हे सिद्ध करण्यासाठी होणाऱ्या लढतीत लंकेला धक्का देणे कदापि सोप्पे नाही याची जाणीव हिंदुस्थानी संघाला नक्कीच झाली असेल. हिंदुस्थानी संघ कितीही बलाढय़ वाटत असला तरी रविवारची खेळपट्टी कोणाला कधी साथ देईल हे निश्चित सांगता येत नाही.