Asia Cup 2023 Final – रोहितमुळे सिराजचा विश्वविक्रम हुकला

आशिया चषकाच्या अंतिम लढतीत सिराजने आपल्या दुसऱ्याच षटकात चार विकेट टिपल्यानंतर तिसऱया षटकात आणखी एक विकेट घेत 5 धावांतच 5 विकेट मिळविले. तेव्हा श्रीलंकेची 6 बाद 12 अशी दुर्दशा झाली होती. त्यानंतर सिराजने आपल्या सहाव्या षटकात कुसल मेंडिसला बाद करून आपला सहावा विकेटही टिपला. त्यानंतरही सिराजने सलग सातवे षटक फेकले, पण या षटकात त्याला एकही विकेट टिपता आला नाही. वन डे क्रिकेटच्या इतिहासात आजवर केवळ 12 गोलंदाजांनाच एका डावात सात विकेट टिपता आले आहेत आणि केवळ चामिंडा वास हा एकमेव गोलंदाज आहे ज्याने आठ विकेट टिपण्याचा विश्वविक्रम रचला आहे, जो 20 वर्षांनंतरही अबाधित आहे.

आज सिराजला वासच्या विश्वविक्रमाची बरोबरी साधण्याची संधी होती, पण रोहित शर्माने सात षटकांनंतर सिराजची गोलंदाजी थांबविण्याचा निर्णय घेतला. जर रोहितने सिराजचा स्पेल सुरूच ठेवला असता तर तो वासच्या विक्रमासमीपही पोहचू शकला असता. श्रीलंकेचे शेवटचे दोन्ही फलंदाज सिराजला सहज बाद करता आले असते. पण सिराजऐवजी हार्दिकच्या हातात चेंडू दिला आणि त्याने पहिल्या दोन्ही चेंडूंवर विकेट घेत श्रीलंकेचा डाव संपुष्टात आणला. सलग सात षटके टाकल्यानंतर आठवे षटकही सिराजला द्यायला हवे होते. वन डे जशी द्विशतकी खेळी क्वचितच घडते तसेच एका डावात सात आणि आठ विकेट टिपण्याचा पराक्रमही दुर्मिळ आहे.

एकाच षटकात 4 विकेट

सिराजने आपल्या सामन्यातील दुसऱ्याच षटकात 4 विकेट घेत विक्रमाची पुनरावृत्ती केली. फक्त त्याला हॅटट्रिक घेण्यात अपयश आले. याआधी वन डे क्रिकेटमध्ये एकाच षटकात तीन फलंदाजांनी हा विक्रम केला होता. 2003 साली चामिंडा वासने हॅटट्रिकची नोंद करताना षटकात 4 विकेट घेतल्या होत्या. त्यानंतर मोहम्मद सामी (2003) आणि 2019 साली इंग्लंडच्या आदिल राशीदने वेस्ट इंडीजविरुद्ध हाच पराक्रम केला होता. सिराजने त्याच विक्रमाची पुनरावृत्ती केली.

Asia Cup 2023 Final – 23 वर्षांनंतर घेतला बदला

सिराजचे 21 धावांत 6 विकेट

सिराजचा आजचा स्पेल अद्भुत आणि अफलातून होता. जसप्रीत बुमराने तिसऱयाच चेंडूवर कुसल परेराला बाद करून भन्नाट सुरुवात केली. ढगाळ वातावरणात सुरू झालेल्या या सामन्यात कधीही पाऊस बरसण्याची शक्यता होती, पण त्यापूर्वीच सिराज नावाची त्सुनामी श्रीलंकन संघावर आदळली. सिराजचे पहिले षटक निर्धाव गेले, पण दुसऱया षटकाच्या पहिल्याच चेंडूवर त्याने पथुम निसांका बाद केले. त्यानंतर आलेल्या सदिरा समरविक्रमाने दुसरा चेंडू खेळून काढला, पण पुढच्या चेंडूवर तो पायचीत झाला. मग त्याने चरिथ असलंकाला बाद करत षटकातील तिसरा बळी टिपला. पाचव्या चेंडूवर त्याला हॅटट्रिकची संधी होती, पण धनंजयाने सिराजला चौकार ठोकला आणि शेवटच्या चेंडूवर तोसुद्धा सिराजचा विकेट ठरला. या विकेटसह सिराजने एकाच षटकात 4 विकेट घेण्याचा पराक्रम केला. मग पुढच्या षटकांत सिराजने दासुन शनाकाचा त्रिफळा उडवत 5 धावांत 5 विकेट घेण्याचा विक्रमही केला.

दानवीर सिराज! ‘सामनावीर’ म्हणून मिळालेली बक्षिसाची रक्कम ग्राऊंड्समनना अर्पण केली