आशिया कप स्पर्धा पाकिस्तानातच होण्याची दाट शक्यता, हिंदुस्थानी संघाच्या सामन्यांबाबत महत्त्वाचा निर्णय

आशिया कप 2023 स्पर्धा पाकिस्तानातच आयोजित व्हावी यासाठी पाकिस्तानच्या क्रिकेट बोर्डाने शर्थीचे प्रयत्न सुरू केले आहेत. मात्र पाकिस्तानात जाऊन क्रिकेट सामने न खेळण्याच्या भुमिकेवर हिंदुस्थानचे क्रिकेट नियामक मंडळ अर्थात बीसीसीआय ठाम आहे. यावरून सुरू असलेला वाद आता संपण्याची शक्यता निर्माण झाली आहे. दोन्ही देशांचे समाधान व्हावे यासाठी एक तोडगा काढण्यात आला आहे.

बीसीसीआय आणि पीसीबी यांच्यात आशिया कप स्पर्धेच्या आयोजनावरून एक बैठक झाल्याचे कळते आहे. या बैठकीत या स्पर्धेबाबत तोडगा काढण्यात आल्याचे कळते आहे. ईएसपीएन क्रिकइन्फोने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे की या स्पर्धेचं आयोजन पाकिस्तानातच केलं जाण्याची शक्यता प्रबळ आहे. मात्र हिंदुस्थानी संघ पाकिस्तानात जाऊन एकही सामना न खेळण्याच्या भुमिकेवर ठाम आहे. यामुळे हिंदुस्थानी संघाचे सगळे सामने हे त्रयस्थ ठिकाणी खेळवण्यात येतील असे सांगण्यात येत आहे.

आशिया कप स्पर्धेतील सामना हिंदुस्थानचा संघ कोणत्या देशात खेळेल याबाबत अद्याप निर्णय झालेला नाहीये. मात्र हे सामने संयुक्त अरब अमिराती, ओमान, श्रीलंका किंवा इंग्लंडमध्ये खेळवण्यात येऊ शकतात अशी शक्यता आहे. यातील इंग्लंडची शक्यता ही दुरापास्त आहे, कारण यासाठी प्रवासाचा वेळ अधिक लागेल.

आशिया कप स्पर्धेसाठी सहभागी देशांचे गट तयार करण्यात आले आहे. हिंदुस्थान आणि पाकिस्तान हे संघ पुन्हा एकदा एकाच गटात आले आहेत. यामुळे जर हे दोन्ही संघ फायनलपर्यंत धडक मारू शकले तर या स्पर्धेत तीन वेळा उभय संघांमध्ये सामना होण्याची शक्यता आहे. ही स्पर्धा सप्टेंबरह महिन्यात होण्याची शक्यता असून ही स्पर्धा 13 दिवस चालणार आहे. स्पर्धेच्या ‘गट अ’मध्ये हिंदुस्थान आणि पाकिस्तानव्यतिरिक्त आणखी एक संघ असणार आहे. ‘गट ब’ मध्ये श्रीलंका, बांग्लादेश आणि अफगाणिस्तान हे तीन संघ असतील. दोन्ही गटातील पहिले दोन संघ सुपर 4 साठी पात्र होतील ज्यातील दोन संघ हे अंतिम फेरीत पोहोचतील.

ही स्पर्धा टी20 स्वरुपाची नसून ती 50 षटकांच्या सामन्यांची असणार आहे. स्पर्धेत अंतिम सामना धरून एकूण 13 सामने खेळवण्यात येणार आहेत. या स्पर्धेचं आयोजन कसं करावं, त्रयस्थ देशांतील सामन्यांचे वेळापत्रक कसे असेल ते सगळ्या सहभागी देशांना मान्य असेल अथवा नाही या सगळ्याचा उहापोह करून तोडगा काढण्यासाठी एका कार्यसमूहाचे गठन करण्यात आले आहे. सगळ्या सहभागी देशांचे समाधान व्हावे यासाठी हा समूह प्रयत्न करणार आहे. हिंदुस्थानी संघाचे सामने त्रयस्थ देशांत खेळवण्याबाबत आशियाई क्रिकेट परिषदेने तत्वत: मान्यता दिली असल्याचं कळतं आहे. या बैठकीला पाकिस्तानी क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष नजीम सेठी हजर होते तर बीसीसीआयचे सचिव जय शाह आणि आयपीएल गव्हर्निंग काऊन्सिलचे अध्यक्ष अरुण धुमाळ हे या बैठकीस उपस्थित होते.

गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात बीसीसीआयने आशिया कप स्पर्धा ही पाकिस्तानात खेळवण्यात येणार नाही असे म्हटले होते. असे झाल्यास पाकिस्तान या स्पर्धेतून बाहेर पडेल अशी पाकिस्तानी क्रिकेट बोर्डाने धमकी दिली होती. यावरून नुकत्याच पार पडलेल्या आशियाई क्रिकेट बोर्डाच्या बैठकीतही तणातणी झाली होती. वाद वाढत असलेला पाहून श्रीलंकेने मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला होता. या स्पर्धेचं आयोजन आपण करण्यास तयार असल्याचा प्रस्ताव श्रीलंकेने ठेवला होता जो पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने अमान्य केला.