
आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत सर्वप्रथम फायनलचे तिकीट बुक करून निश्चित झालेला हिंदुस्थानी संघ उद्या बांगलादेशविरुद्धच्या औपचारिक लढतीत बाकावरील खेळाडूंना संधी देण्याची शक्यता आहे. तोंडावर आलेल्या वर्ल्ड कपच्या पार्श्वभूमीवर इतर खेळाडूंनाही सामन्याचा सराव मिळावा यासाठी काही प्रमुख खेळाडूंना अखेरच्या सुपर-फोर लढतीत विश्रांती दिली तर नवल वाटायला नको.
‘टीम इंडिया’चा प्रमुख वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने या स्पर्धेत केवळ 12 षटके गोलंदाजी केलीय. त्यामुळे दुखापतीतून सावरलेल्या या गोलंदाजाला औपचारिक लढतीत खेळायचे की नाही, हे ठरविण्याचे स्वातंत्र दिले जाईल. मोहम्मद सिराजने 19.2, तर हार्दिक पंडय़ाने 18 षटके गोलंदाजी केलीय. त्यामुळे या गोलंदाजांना विश्रांती देण्याचा निर्णय संघ व्यवस्थापन घेऊ शकते. त्यामुळे बांगलादेशविरुद्धच्या लढतीत सिराजऐवजी मोहम्मद शमीला संधी दिली जाण्याची शक्यता आहे. कारण वर्ल्ड कपच्या पार्श्वभूमीवर शमीसारख्या अनुभवी गोलंदाजाला सामन्याचा सरावही तितकाच महत्त्वाचा आहे. अक्षर पटेल हा रवींद्र जाडेजासाठी पर्यायी खेळाडू आहे. मात्र आशिया चषकात त्याला गोलंदाजीत ना विकेट मिळाल्या-ना धावगतीला लगाम घालता आला. त्यामुळे पटेलला आपल्या कामगिरीत सुधारणा करावी लागणार आहे.
बांगलादेशबाबत बोलायचे झाल्यास हिंदुस्थानविरुद्धच्या सुपर-फोर लढतींतही यष्टिरक्षक फलंदाज मुशफिकर रहीम संघाबाहेर असेल. त्यामुळे लिटन दास उद्याच्या लढतीत यष्टिरक्षण करताना दिसेल. बांगलादेशचा कर्णधार शाकिब अल हसन कौटुंबिक सुट्टीनंतर पुन्हा एकदा संघात दाखल झालाय.
Asia Cup 2023 – पाकिस्तानचं पॅकअप, श्रीलंकेचा शेवटच्या चेंडूवर विजय; फायनलमध्ये हिंदुस्थानशी भिडणार
सूर्यकुमार की इशान
लोकेश राहुलने दुखापतीतून सावरल्यानंतर यष्टीपुढे अन् यष्टीमागेही सुरेख कामगिरी केली आहे. तो मधल्या फळीतील महत्त्वाचा फलंदाज आहे. त्यामुळे बांगलादेशविरुद्ध राहुल खेळण्याची शक्यता आहे. श्रेयस अय्यर फिट असेल तर त्यालाही संधी देण्यासाठी संघ व्यवस्थापन प्रयत्नशील असेल. पाठीत उसन भरल्याने त्याला पाकिस्तान व श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात खेळता आले नव्हते. अय्यरने गुरुवारी नेटमध्ये कसून सराव केलेला आहे. अय्यरला आणखी विश्रांती देण्याचा निर्णय झाल्यास इशान किशन व सूर्यकुमार यादव यांच्यापैकी एकाला संधी मिळेल. इशानने एकदिवसीय क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी केलेली आहे, पण सूर्यकुमारला समाधानकारक कामगिरी करता आलेली नाही. मात्र, धडाकेबाज फलंदाज असलेल्या सूर्यकुमारला उद्याच्या लढतीत संधी दिली जाऊ शकते.