
आठ महिन्यांच्या विश्रांतीनंतर संघात परतलेल्या श्रेयस अय्यरचं दुखणं काही केल्या पाठ सोडेना. त्यामुळे या अनफिट फलंदाजांचं काय करायचं अशा द्विधा मनःस्थितीत हिंदुस्थानी संघ सापडला आहे. उद्या आशिया चषकातला सुपर-फोरचा अखेरचा सामना असून श्रेयसने खेळण्यासाठी जोरदार सरावही केला आणि आपण फिट असल्याचेही दाखवण्याचे प्रयत्न केलेत, पण उद्याही तो खेळू शकला नाहीतर संघ व्यवस्थापनाला दुसऱ्या पर्यायांचा शोध घ्यावा लागणार आहे.
सध्या हिंदुस्थानचा संघ वर्ल्ड कपच्या पूर्वतयारीसाठी आशिया चषकात जोरदार कामगिरी करतोय. या स्पर्धेसाठी हिंदुस्थानी संघात श्रेयस आणि राहुलला पुनरागमनाची संधी देण्यात आली होती. चौथ्या क्रमांकासाठी श्रेयसचे नाव आघाडीवर होते. पण पाकिस्तानविरुद्धच्या सुपर-फोर सामन्यात संघ निवडीच्या पाच मिनिटे आधी पाठीत उसण आल्यामुळे श्रेयसऐवजी राहुलला लॉटरी लागली. आता राहुलने संघात आपले स्थान निश्चित केल्यामुळे फॉर्मात असलेल्या इशान किशनलाही डावलणे, संघव्यवस्थापनाला जड जात आहे. त्यामुळे श्रेयससाठी संघात स्थान निर्माण करताना दोघांपैकी एकाला विश्रांती द्यावीच लागणार हेसुद्धा निश्चित आहे. यात इशानचे नाव पुढे असेल.
ऑस्ट्रेलियाविरुद्ध निवड होणार?
आशिया चषकात श्रेयस अय्यरला अद्याप काहीही करता आलेले नाही. त्यामुळे त्याला दुखऱ्या पाठीसह संघाबरोबर फिरवणे कितपत योग्य आहे, याचा विचार संघ व्यवस्थापन करू लागला. उर्वरित दोन्ही लढतींत श्रेयस अंतिम अकरामध्ये दिसू शकला नाही तर ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेसाठी संघ व्यवस्थापनाला श्रेयसऐवजी दुसऱ्या पर्यायांचाही शोध घ्यावा लागणार आहे.
..तर कुणाचं भाग्य फळफळणार ?
श्रेयसचं भवितव्य त्याच्या पाठीवर अवलंबून आहे. तो फिट व्हावा आणि वर्ल्ड कपमधे खेळावा म्हणून संघ व्यवस्थापन त्याला संघात ठेवून आहे. मात्र तो अंतिम अकरात बसूच शकला नाही तर संघ व्यवस्थापनाला शेवटच्या क्षणी संघाबाहेर गेलेल्या तिलक वर्मा आणि संजू सॅमसन यांचा विचार करावा लागण्याची शक्यता आहे. तसे पाहता संघात सध्या सूर्यकुमार यादवही वेटिंगवर आहे, पण श्रेयसच्या दुखापतीने राहुलला संघात स्थान मिळवून दिले आहे. तसेच दुखण्याने त्याची पाठच सोडली नाहीतर आणखी एका खेळाडूचे भाग्य फळफळेल, एवढे मात्र निश्चित आहे. पण हे घडू नये अशी संघ व्यवस्थापनाची इच्छा आहे.