आशिया कप महिला हॉकी स्पर्धा : हिंदुस्थान उपांत्य फेरीत

37

सामना प्रतिनिधी, गिफू

हिंदुस्थानच्या महिला हॉकी संघाने जबरदस्त खेळ करीत कझाकस्तानचा ७-१ अशा फरकाने धुव्वा उडवला आणि जपानमध्ये सुरू असलेल्या आशिया कप हॉकी स्पर्धेच्या उपांत्य फेरीत धडक मारली. गुरजीत कौरने तीन गोल करीत हिंदुस्थानच्या विजयात मोलाची भूमिका बजावली. दीप ग्रेस व नवनीत कौर यांनी प्रत्येकी दोन गोल करीत उत्तम साथ दिली. आता उद्या होणाऱ्या उपांत्य फेरीच्या लढतीत हिंदुस्थानचा महिला संघ यजमान जपानला भिडणार आहे. जपानने मलेशियाला
२-० असे हरवत अंतिम चारमध्ये प्रवेश केला.

दुसऱ्याच मिनिटाला पिछाडी पण…
हिंदुस्थानच्या हॉकी संघाला उपांत्यपूर्व फेरीच्या लढतीत दुसऱ्याच मिनिटात पिछाडीवर राहावे लागले. कझाकस्तानच्या वेरा दोमाशनेवा हिने गोल करीत त्यांना आघाडी मिळवून दिली. त्यानंतर चौथ्या मिनिटाला गुरजीत कौरने कझाकस्तानचा बचाव भेदत हिंदुस्थानसाठी पहिला गोल केला. यानंतर हिंदुस्थानने मागे वळून बघितले नाही. दीप ग्रेसने १६ व्या व ४१ व्या मिनिटाला आणि नवनीत कौरने २२ व्या व २७ व्या मिनिटाला गोल करीत हिंदुस्थानला ५-०ने पुढे नेले. गुरजीतने ४२ व्या व ५६ व्या मिनिटाला गोल करीत हिंदुस्थानच्या ‘महाविजयावर’ शिक्कामोर्तब केले.

साखळी फेरीत निर्विवाद वर्चस्व
हिंदुस्थानच्या महिला हॉकी संघाने साखळी फेरीत तिन्ही सामन्यांत दिमाखदार विजय मिळवत निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केले. त्यामुळे हिंदुस्थानला ‘अ’ गटात ९ गुणांनिशी अव्वल स्थानावर झेप घेता आली होती.

उपांत्य फेरीच्या लढती खालीलप्रमाणे
हिंदुस्थान – जपान
चीन – दक्षिण कोरिया
(टीम – दोन्ही लढती ३ नोव्हेंबरला होतील)

आपली प्रतिक्रिया द्या