हिंदुस्थानचा पाकिस्तानला दणका, बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुलीने केली मोठी घोषणा

3941

ऑस्ट्रेलियात होणाऱ्या आगामी टी-20 वर्ल्डकपपूर्वी होणाऱ्या आशिया कपचे यजमानपद पाकिस्तानने गमावले आहे. हिंदुस्थानने पाकिस्तानमध्ये खेळण्यास नकार दिल्याने आशिया कप आता दुबईमध्ये होणार आहे. सप्टेंबर महिन्यात होणारा आशिया कप दुबईत होणार आहे. या स्पर्धेत हिंदुस्थान आणि पाकिस्तान दोन्ही संघ सहभागी होतील, असे बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांनी सांगितले. आशियान क्रिकेट काऊंन्सिलच्या बैठकीसाठी दुबईला रवाना होण्यापूर्वी सौरव गांगुली यांनी ही माहिती दिली.

पाकिस्तानमध्ये 2020 चा आशिया कप होईल हे गेल्यावर्षी स्पष्ट करण्यात आले होते. मात्र बीसीसीआयने यास स्पष्टपणे नकार दिला होता. दोन्ही देशात तणावपूर्ण परिस्थिती असल्याने हिंदुस्थानचा संघ पाकिस्तानमध्ये क्रिकेट खेळणार नाही, असे बीसीसीआयने आयसीसीला स्पष्ट शब्दांमध्ये सांगितले होते. हिंदुस्थानच्या विरोधामुळे पाकिस्तानलाही माघार घ्यावी लागली. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे सीईओ वसीम खान यांनी देखील आशिया कपचे आयोजन तटस्थ ठिकाणी केले जाऊ शकते असे म्हणत संकेत दिले होते. त्यानंतर अखेर दुबईच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आला आहे.

द्विपक्षीय मालिका नाही
2008 मध्ये मुंबईत झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर दोन्ही देशातील द्विपक्षीय मालिका बंद झाल्या होत्या. चार वर्षांनी 2012-13 मध्ये दोन देशातील सामजस्यामुळे पाकिस्तानचा संघ हिंदुस्थानच्या दौऱ्यावर आला. पाकिस्तानने येथे तीन एक दिवसीय लढती खेळल्या होत्या. परंतु मुंबई हल्ल्यानंतर हिंदुस्थानचा संघ एकदाही पाकिस्तानच्या दौऱ्यावर गेला नाही. दोन्ही देशांमधील द्विपक्षीय मालिका बंद झाल्या. फक्त आयसीसीच्या स्पर्धांमध्ये आणि आशिया कपमध्ये दोन्ही संघ आमनेसामने येत होते. आशिया कपचे यजमान पद पाकिस्तानला दिल्याने हिंदुस्थानने विरोध दर्शवला होता. त्यामुळे आता दुबईमध्ये ही स्पर्धा होणार आहे.

सात वेळा विजेतेपद
आशिया कप सर्वात आधी 1984 ला संयुक्त अरब अमिरातमध्ये खेळला गेला. दर दोन वर्षांनी होणाऱ्या या स्पर्धेवर हिंदुस्थानने आतापर्यंत सात वेळा मोहोर उमटवली आहे. 2018 मध्ये आशिया कपचे आयोजन यूएईमध्ये करण्यात आले होते. आतापर्यंत आशिया कपवर हिंदुस्थानने सात वेळा, श्रीलंकेने पाच वेळा, पाकिस्तानने दोन वेळा विजयी मोहोर उमटवली आहे. बांगलादेशच्या संघाला अद्याप ही स्पर्धा जिंकता आलेली नाही.

आपली प्रतिक्रिया द्या