श्रीकांत सलामीलाच गारद; आशियाई बॅडमिंटन; सायना, सिंधूची विजयी सलामी

सामना ऑनलाईन । वुहान (चीन)

आठव्या मानांकित हिंदुस्थानच्या किदाम्बी श्रीकांतला आशियाई बॅडमिंटन स्पर्धेत सलामीलाच पराभवाची नामुष्की पत्करावी लागली. दुसरीकडे महिला एकेरीत सायना नेहवाल व पी. व्ही. सिंधू या हिंदुस्थानच्या स्टार खेळाडूंनी अपेक्षेप्रमाणे विजयी सलामी दिली.

किदाम्बी श्रीकांतला जागतिक क्रमवारीत 51 व्या स्थानी असलेल्या इंडोनेशियाच्या शेसार हिरेन रुस्तावितोने चुरशीच्या लढतीत 21-16, 22-20 असे पराभूत केले. श्रीकांतला हिरेनकडून दुसऱयांदा हार पत्करावी लागली. याआधी 2011 मध्ये ज्युनियर स्पर्धेतही श्रीकांत त्याच्याकडून पराभूत झाला होता.

सायना नेहवालने यजमान चीनच्या हान यूए हिचा 12-21, 21-11, 21-17 असा पराभव करून दुसऱया फेरीत प्रवेश केला. आता तिची गाठ जपानच्या किम गा इयुन हिच्याशी पडेल. इयुनने इंडोनेशियाच्या रुसेली हर्तवानचा 21-12, 21-19 असा पराभव केला. पी. व्ही. सिंधूने जपानच्या सयाका ताकाहाशी हिचा 21-17, 21-7 असा सरळ सेटमध्ये धुव्वा उडवला. दुसऱया फेरीत सिंधूची गाठ इंडोनेशियाच्या चोइरूनिसा हिच्याशी पडेल. दुसरीकडे हिंदुस्थानच्या समीर वर्माने जपानच्या काजुमासा साकाई याचा 21-13, 17-21, 21-18 असा पराभव करून विजयी सलामी दिली. आता त्याची गाठ हाँगकाँगच्या लाँग अंगुस याच्याशी पडेल.