‘सुवर्ण’कन्या! हिंदुस्थानच्या महिला संघाने रचला इतिहास, श्रीलंकेचा धुव्वा उडवत जिंकलं सुवर्णपदक

आशियाई क्रीडा स्पर्धेत हिंदुस्थानच्या महिला संघाने अंतिम लढतीत श्रीलंकेचा पराभव करत सुवर्णपदक जिंकले आहे. अंतिम लढतीमध्ये श्रीलंकेने हिंदुस्थानच्या महिला संघाला 116 धावांमध्ये रोखले. या माफक आव्हानाचा बचाव करत हिंदुस्थानने 19 धावांनी विजय मिळवला.

अंतिम लढतीमध्ये कर्णधार हरमनप्रित कौर हिने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. हिंदुस्थानला शेफाली वर्माच्या रुपाने 16 धावांवर पहिला धक्का बसला. यानंतर स्मृती मंधाना आणि जेमिमा रॉड्रिग्स यांच्यात अर्धशतकीय भागिदारी झाली.

या दोघी मैदानात असेपर्यंत हिंदुस्थानचा संघ आरामात दीडशे धावांचा आकडा गाठेल असे वाटत होते. मात्र त्यानंतर हिंदुस्थानचा डाव कोसळला आणि एकामागोमाग एक विकेटची रांग लागली. मंधाना 46, रिचा घोष 9, हरमनप्रित कौर 2, पूजा वस्त्रकर 2 आणि रॉड्रिंग्स 42 धावांवर बाद झाली. हिंदुस्थानचा संघ निर्धारित 20 षटकांमध्ये 7 बाद 116 धावा केरू शकला

हिंदुस्थानने दिलेल्या माफक आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या श्रीलंकेची सुरुवात खराब झाली. अवघ्या 14 धावांवर श्रीलंकेने तीन विकेट्स गमावल्या. या तिन्ही विकेट्स वेगवान गोलंदाज टी. साधू हिने घेतल्या. खराब सुरुवातीनंतर एच. परेरा आणि एन सिल्वा यांनी काही वेळ मैदानात शड्डू ठोकला. मात्र पुढे हिंदुस्थानच्या फिरकी गोलंदाजांनी मोर्चा सांभाळत श्रीलंकेच्या फलंदाजांना जखडून ठेवले.

श्रीलंकेचा संघ 20 षटकांमध्ये 8 बाद 97 एवढीच मजल मारू शकला. हिंदुस्थानकडून टी. साधूने 3, राजेश्वरी गायकवाडने 2, तर दिप्ती शर्मा, देविका वैद्य आणि पूजा वस्त्रकरने प्रत्येकी 1 विकेट घेतली. दरम्यान, आशियाची स्पर्धेमध्ये हिंदुस्थानने आतापर्यंत 11 पदकं जिंकली आहेत. यात दोन सुवर्ण, तीन रौप्य आणि सहा कांस्यपदकांचा समावेश आहे.