हिंदुस्थानच्या महिलांचा सुवर्ण धमाका, दिव्या, सरिता, पिंकीने पटकावले सुवर्ण

351

हिंदुस्थानी कुस्तीपटूंची दमदार कामगिरी आशियाई कुस्ती चॅम्पियनशिपच्या तिसऱया दिवशीही सुरूच राहिली. दिव्या काकरन, सरिता व पिंकी या हिंदुस्थानच्या महिला खेळाडूंनी प्रतिस्पर्ध्यांना चीतपत करीत सुवर्ण पदकाला गवसणी घातली. निर्मला देवीला मात्र रौप्य पदकावरच समाधान मानावे लागले. हिंदुस्थानने गुरुवारी चार पदकांची कमाई केली.

दिव्या काकरन हिने 68 किलो वजनी गटात जपानच्या नरूहा मतसुयूकी हिला 6-4 अशा फरकाने हरवत पहिल्या स्थानावर झेप घेतली. 68 किलो वजनी गटात पाच देशांचेच खेळाडू जेतेपदाच्या शर्यतीत होते. त्यामुळे या पाच खेळाडूंमध्ये साखळी फेरीच्या लढती खेळवण्यात आल्या. दिव्या काकरन हिने कझाकस्तान, मंगोलिया, उझबेकिस्तान व जपान या चारही देशांतील खेळाडूंना हरवत सुवर्ण पदक जिंकले.

55 किलो वजनी गटात पिंकीने मंगोलियाच्या दुलगुण बोलोरमा हिला 2-1 अशा फरकाने हरवत देशाला दिवसातील दुसरे सुवर्ण पदक मिळवून दिले. अखेर 59 किलो वजनी गटात सरिताने मंगोलियाच्या बॅटसेटसेग ऍलटॅण्टसेटसेग हिला 3-2 असे नमवत सुवर्ण पदक पटकावले.

आपली प्रतिक्रिया द्या