आशियाई कुस्ती अजिंक्यपद स्पर्धा; रविकुमारला सुवर्ण, बजरंगची दुखापतीमुळे माघार

हिंदुस्थानच्या रविकुमार दहियाने आशियाई कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेत सलग दुसऱयांदा सुवर्णपदक जिंकण्याचा पराक्रम केला. मात्र हिंदुस्थानचा स्टार कुस्तीपटू बजरंग पुनियाला दुखापतीमुळे सुवर्णपदकाच्या लढतीतून माघार घ्यावी लागल्याने रौप्यपदकावरच समाधान मानावे लागले.

टोकियो ऑलिम्पिकचा कोटा अधिक मिळविलेल्या रविकुमार दहियाने 57 किलो गटाच्या अंतिम लढतीत इराणच्या अलीरेजा नोसरातोलाह सरलॉकचा 9-4 गुणफरकाने पराभव केला. सलामीच्या लढतीत त्याने उझबेकिस्तानच्या नोदिरजोन सफरोवचा 9-2 गुणांनी धुव्वा उडवला होता. रविकुमारने उपांत्य लढतीत फिलिस्तीनच्या अली अबुयमैलाचा पराभव करून अंतिम पैरीत धडक दिली होती.

नरसिंग, सत्यव्रत, कर्ण यांना कास्य

बजरंग व रविकुमार यांच्याशिवाय नरसिंग यादव, सत्यव्रत कादियान व कर्ण या हिंदुस्थानी मल्लांनी कास्यपदकाची कमाई केली. नरसिंगला 74 किलो गटामध्ये उपांत्य लढतीत हार पत्करावी लागली. सत्यव्रतने उझबेकिस्तानच्या मुखमादरासुल रखिमोवचा 4-1 ने पराभव करून उपांत्य फेरी गाठली होती, मात्र उपांत्य लढतीत इराणच्या अली खलीलकडून त्याचा पराभव झाला. कर्णने 70 किलो गटात रेपचेज राऊंडमध्ये कोरियाच्या सुंगबोंग ली याचा 3-1 गुणफरकाने पराभव करून कास्यपदकाची कमाई केली.

हिंदुस्थानला 6 ऑलिम्पिक कोटा

टोकियो ऑलिम्पिकसाठी हिंदुस्थानच्या सहा कुस्तीपटूंनी आतापर्यंत कोटा मिळवला आहे. यात बजरंग पुनिया (65 किलो),
विनेश फोगाट (53 किलो), रविकुमार

(57 किलो), दीपक पुनिया (86 किलो), अंशू मलिक (57 किलो) व सोनम मलिक (65 किलो) या कुस्तीपटूंनी हिंदुस्थानला ऑलिम्पिकचा कोटा मिळवून दिलेला आहे. आता 29 एप्रिल ते 2 मे या कालावधीत होणाऱया जागतिक पात्रता स्पर्धेत हिंदुस्थानी मल्लांना टोकियो ऑलिम्पिकचे तिकीट बुक करण्याची अखेरची संधी असेल.

प्रशिक्षकांच्या सल्ल्याने माघार

बजरंग पुनियाच्या हाताचा कोपरा पुन्हा एकदा दुखावल्याने त्याला अंतिम लढतीतून माघार घ्यावी लागली. 65 किलो गटात जपानचा त्याचा चिरप्रतिद्वंद्वी ताकुतो ओटागुरो याच्याशी त्याची सुवर्णपदकाची झुंज रंगणार होती, मात्र बजरंगच्या प्रशिक्षकांनी त्याला अंतिम लढतीत न खेळण्याचा सल्ला दिला. बजरंगला कोरियाच्या योंगसियोग जियोंगविरुद्धच्या उपांत्यपूर्व लढतीत उजव्या हाताच्या कोपराला त्रास जाणवला. जागतिक कुस्ती स्पर्धेत याच हाताला बजरंगला दुखापत झाली होती. उपांत्य लढतीत त्याने मंगोलियाच्या बिलगुन सरमानदाखला हरवले, मात्र या कुस्तीतही हाताचा त्रास जाणवला होता. त्यामुळे टोकियो ऑलिम्पिकच्या पार्श्वभूमीवर धोका नको म्हणून बजरंगने अंतिम लढतीतून माघार घेण्याचा निर्णय घेतला.

आपली प्रतिक्रिया द्या