विमान 650 फूट उंचीवर असताना प्रवाशाने उघडले इमर्जन्सी गेट, जोरदार वाऱ्यामुळे प्रवासी बेशुद्ध

दक्षिण कोरियाच्या आशियाना एअरलाइन्सच्या फ्लाइटमधील एका प्रवाशाने फ्लाइटचे इमर्जन्सी एक्झिट गेट हवेतच उघडल्याचा प्रकार समोर आला आहे. लँडिंगच्या काही वेळापूर्वी ही घटना घडली. त्यावेळी विमान सुमारे 650 फूट उंचीवर होते. याप्रकरणी प्रवाशाला अटक करण्यात आली आहे. आशियाना एअरलाइन्स या प्रकरणाचा तपास करत आहे.

एएफपी या वृत्तसंस्थेच्या वृत्तानुसार ही घटना शुक्रवारी घडली. एअरबस A321-200 मध्ये 6 क्रू मेंबर आणि 194 प्रवासी होते. राजधानी सेऊलपासून सुमारे 240 किमी दक्षिणपूर्व डेगू आंतरराष्ट्रीय विमानतळावर हे विमान उतरणार होते. जेव्हा फ्लाइट हवेत सुमारे 200 मीटर (650 फूट) होते, तेव्हा त्याच्या आपत्कालीन एक्झिटजवळ बसलेल्या एका प्रवाशाने गेट उघडले. या घटनेत जखमीझालेल्या 9 जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

दक्षिण कोरियाची वृत्तसंस्था ‘योन्हॅप’ने या घटनेचा व्हिडिओ शेअर केला आहे. विमानाचे इमर्जन्सी एक्झिट गेट हवेच्या मध्यभागी उघडल्याने जोरदार वाऱ्यामुळे सर्व काही विस्कळीत होऊ लागल्याचे फुटेजमध्ये दिसत आहे. विमानातील वस्तू प्रवाशांच्या अंगावर पडत आहेत. काही प्रवासी घाबरून ओरडताना या व्हिडिओमध्ये दिसत आहे.

या घटनेबद्दल एका प्रत्यक्षदर्शीने सांगितले की, ‘अचानक असे वाटले की फ्लाइटमध्ये स्फोट होणार आहे. दाराजवळ बसलेले प्रवासी बेशुद्ध पडू लागले. यावेळी फ्लाइटमध्ये लहान मुलेही होती, आणि काही प्रवासी रडत देखील होते.

दरम्यान विमानाचा दरवाजा हवेत उघडणाऱ्या 30 वर्षीय प्रवाशाला पोलिसांनी अटक केली आहे. अटक केलेल्या प्रवाशाने असे का केले? त्याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. या फ्लाइटमध्ये 48 खेळाडूही उपस्थित होते, जे जवळच्या उल्सान शहरात एका राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत भाग घेणार होते. याबद्दल आशियाना एअरलाइन्सचे म्हणणे आहे की, अचानक दरवाजा उघडल्यामुळे काही प्रवाशांना श्वास घेण्यास त्रास झाला आणि काही लोकांना उतरल्यानंतर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेत कोणतीही मोठी दुखापत किंवा नुकसान झाले नसल्याची माहिती विमान कंपन्यांनी दिली आहे.