हिंदूबहुल भागात गोमांस विक्रीवर बंदी आणणारे विधेयक, मुस्लिमविरोधी असल्याची काँग्रेसची टीका

आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्वा सर्मा यांनी सोमवारी तिथल्या विधानसभेत एक विधेयक (Assam New Cattle Bill 2021) मांडले आहे. या विधेयकाद्वारे हिंदू, जैन आणि शीखबहुल भागांत गोहत्या आणि गोमांस विक्रीवर बंदी घालण्याचा आसाम सरकार प्रयत्न करणार आहे. योग्य कागदपत्रे नसल्यास गोवंशाची आंतरजिल्हा किंवा राज्याबाहेर वाहतूक ही बेकायदेशीर ठरवण्याचीही या विधेयकामध्ये तरतूद करण्यात आली आहे. हे गुन्हे अजामीनपात्र असतील असे या विधेयकात म्हटले आहे.

मुख्यमंत्री सर्मा यांनी हे विधेयक सादर करताना म्हटले की विधेयक मंजूर झाल्यानंतर जो कायदा अस्तित्वात येईल तो हिंदू, जैन, शीख आणि गोमांस न खाणारा समुदाय जिथे राहात असेल अशा भागात गोवंश हत्या आणि गोमांस विक्री होणार नाही याची काळजी घेणारा असेल. या विधेयकामध्ये मंदिरे किंवा काही ठराविक संस्थांच्या 5 किलोमीटरच्या परिसरात गोवंश हत्याबंदीचीही तरतूद करण्यात आली आहे. काही धार्मिक बाबींसाठी गोवंश हत्येसाठी कायद्यातील तरतूदींमध्ये सवलत देण्यात येणार आहे.

आसाममध्ये गोवंश संरक्षण कायदा हा 1950 साली अस्तित्वात आला होता. मात्र या कायद्यात गोवंश हत्या, वाहतूक यासाठीचे नियम तकलादू होते आणि म्हणूनच नव्या कायद्याची गरज होती असं आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्वा सर्मा यांनी म्हटलं आहे. नव्या कायद्यामुळे सरसकट कोणीही गोवंशाची हत्या करण्याची पद्धत थांबेल, गोवंश हत्येसाठी लागणारी कागदपत्रे आणि परवानगी असेल तरच ती व्यक्ती हे काम करू शकेल असं सर्मा यांनी म्हटले आहे. इतर राज्यांनीही गोवंश हत्या बंदीसाठीचा कायदा केला आहे, मात्र या राज्यांमध्ये गोवंश हत्या आणि गोमांस विक्री विशिष्ट भागात करू नये अशी तरतूद नाहीये. आसाम सरकार जो कायदा करणार आहे, तो अस्तित्वात आल्यानंतर नियमभंग करणाऱ्यांना 3 वर्ष तुरुंगवास, 3 ते 5 लाखांपर्यंतचा दंड किंवा दोन्ही शिक्षा दिली जाऊ शकेल. दोनवेळा हा गुन्हा करताना व्यक्ती आढळल्यास तिला दुप्पट शिक्षा केली जाईल.

आसाम सरकारच्या या विधेयकाचा काँग्रेसने विरोध केला आहे. देबब्रत सैकीया यांनी आरोप केला आहे की हे विधेयक मुस्लिमविरोधी आहे. मुसलमानांना लक्ष्य करण्यासाठी हे विधेयक आणले जात आहे. या विधेयकातील तरतुदींबाबत आपण कायदेशीर बाबी जाणून घेत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. या विधेयकात 5 किलोमीटरची जी तरतूद करण्यात आली आहे ती हास्यास्पद असल्याचं सैकिया यांचं म्हणणं आहे. कोणीही एखादा दगड कुठेही रोवू शकतो आणि त्याला मंदीर असल्याचं सांगू शकतो असं सैकिया यांचं म्हणणं आहे. ऑल इंडिया युनाइटेड डेमोक्रेटिक फ्रंटचे आमदार अमीनुल हक यांनी म्हटलंय की हे विधेयक गायीच्या सुरक्षेसाठी नाही तर मुसलमानांच्या भावना दुखावण्यासाठी आणले जात आहे. यामुळे समाजात तेढ निर्माण होईल असा आरोपही त्यांनी केला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या