Video – मृत आंदोलकाच्या छातीवर फोटोग्राफरने उड्या मारल्या, आसाममधील भयंकर घटना

आसामच्या दरांग भागामध्ये अतिक्रमणाविरोधातील कारवाईला हिंसक वळण लागलं होतं. पोलिसांनी यावेळी केलेल्या गोळीबारात 2 जणांचा मृत्यू झाला आहे. या हिंसाचारावेळी घडलेली एक घटना कॅमेऱ्यात चित्रीत झाली आहे. पोलिसांच्या दिशेने हातात लाठी घेऊन धावत येणाऱ्या आंदोलकाचा पोलिसांनी केलेल्या गोळीबारात मृत्यू झाला. हा आंदोलक जमिनीवर पडलेला असताना एक फोटोग्राफर धावत जाऊन त्याच्या छातीवर उड्या मारत असल्याचं व्हिडीओत दिसून आलं आहे. पोलिसांनी या फोटोग्राफरला आवरण्याचा प्रयत्न केला, यावेळी हा फोटोग्राफर वळून पुन्हा या आंदोलकाच्या दिशेने गेला आणि त्याच्या छातीवर बुक्के मारायला लागला असं दिसतं आहे.

या फोटोग्राफरची ओळख पटवण्यात आली असून त्याचं नाव बिजॉय बनिया असल्याचं कळालं आहे. त्याला जिल्हा प्रशासनानेच दस्तावेजीकरणासाठी नेमले होते. व्हिडीओमध्ये बिजॉय हा पोलीस लाठ्या चालवत असताना आंदोलकाला लाथाबुक्क्यांनी मारहाण करतानाही दिसला आहे. आसामचे पोलीस महासंचालक भास्करज्योती महंत यांनी बनिया याला अटक केल्याची माहिती प्रसारमाध्यमांना दिली. आंदोलकावर लाठीचार्ज करणाऱ्या पोलिसांवर कारवाई करणार का असा प्रश्न विचारला असता महंत यांनी सांगितले की नियमांचे उल्लंघन होत असताना दिसेल तिथे पोलीस आपले कर्तव्य बजवावणारच. एका पोलीस अधिकाऱ्याने या घटनेबाबत बोलताना सांगितले की जो आंदोलक व्हिडीओमध्ये दिसतोय त्याने 2 पोलीस कर्मचाऱ्यांवर हल्ला केला होता, ज्यातला एक कर्मचारी गंभीररित्या जखमी झाला आहे. दरांग भागात झालेल्या या हिंसक झडपेत 11 जण जखमी झाले असून त्यात 9 पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.

पुनर्वसनाच्या मुद्दावरून उडाला भडका

आसामच्या दरांग जिह्यातील सिपाझार गावात ग्रामस्थांनी सरकारी जमिनीवर केलेला अवैध कब्जा हटवण्यासाठी गेलेले पोलीस आणि ग्रामस्थ यांच्यात गुरुवारी जोरदार चकमक उडाली. अतिक्रमण हटवणाऱ्या पोलिसांवर गावकऱ्यांनी जोरदार दगडफेक केल्यावर पोलिसांनी प्रत्युत्तरादाखल तुफानी लाठीमार आणि गोळीबार केला. या चकमकीत 2 ग्रामस्थ ठार झाले असून 9 पोलीस जवान गंभीर जखमी झाल्याचे वृत्त आहे. सिपाझार गावाला मोठय़ा संख्येने पोलिसांनी वेढा दिला असून सुमारे 40 एकर जमिनीवरील अतिक्रमण गुरुवारी हटवण्यात आले.

सिपाझार गावातील शिवमंदिराशी संबंधित जवळपास 40 एकर जमिनीवरील अतिक्रमण हटवण्याचे आदेश आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्वा सर्मा यांनी सत्तेवर येताच दिले होते. या जमिनीवर झोपडय़ा बांधून राहणारे बहुसंख्य गावकरी हे बंगाली मुस्लिम आहेत. त्यांनी अतिक्रमण हटवण्यास जोरदार विरोध दर्शवला आहे. सोमवारपासून या गावातील अतिक्रमण हटवायला मोठा पोलिसफाटा येणार हे कळताच या भागातील वातावरण अतिशय तंग होते. त्या संतापाचा राग आज पोलिसांवर दगडफेक करून गावकऱ्यांनी काढला. दगडफेकीनंतर पोलिसांनी जमावाला पांगवण्यासाठी लाठीमार केला आणि हवेत गोळीबार केला. पोलीस आणि गावकरी संघर्षात 2 गावकरी ठार झाले असून 9 पोलीस जखमी झाले आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या