आगळं वेगळं: जतिंगा दरीचे गूढ

>>मंगल गोगटे

आसामच्या दिमा हसाओ तालुक्यातल्या जतिंगा या आदिवासी गावाबद्दल सगळय़ात काय विशेष आहे, तर पक्ष्यांच्या आत्महत्या. वर्षातल्या काही विशिष्ट आठवडय़ांत अशा गूढ आत्महत्या घडतात. जतिंगा हे आसाममधील एकमेव हिल स्टेशन. त्यामुळे मृत्यूची दरी म्हणूनही ओळखले जाते. गेल्या जवळपास 100 वर्षांत हजारोंनी पक्षी जतिंगातील एका विशिष्ट भागात जीव देण्यासाठी उडत गेले आहेत. सुमारे 2 हजार 500 लोकसंख्येच्या या खेडय़ातील पक्ष्यांच्या या चमत्कारिक वागणुकीचं रहस्य यावर पक्षी वैज्ञानिकांचा खूपसा अभ्यास होऊनही उलगडलेलं नाही.

काही जणांचं असं म्हणणं आहे की, इथल्या उंचीमुळे व धुक्यामुळे पक्ष्यांची दिशाभूल होते, तर काहींच्या मते हे पक्षी दुष्ट आत्मे असतात. असंही लक्षात आलंय की, पावसाळय़ानंतर अनेक ठिकाणी पूरसदृश परिस्थिती निर्माण झालेली असते आणि खूपसे पक्षी त्यात आपला निवारा गमावतात. म्हणून मग ते दुसऱया ठिकाणी स्थलांतर करतात.

पक्ष्यांनी अशा आत्महत्या करणं ही काही सर्वसामान्यपणे घडणारी गोष्ट नाही. अनेकदा तर असं लक्षात आलं आहे की, पक्षी आत्महत्या करत नाहीत, तर काही प्रमाणात ते मारले जातात, परंतु असं अंधश्रद्धेपोटी पसरवलं गेलं आहे की, गेल्या शंभरपेक्षा जास्त वर्षे हजारो पक्षी इथल्या एका भागात जीव देण्याच्या उद्देशाने उडत जातात. जसे विचित्रपणे बर्म्युडा ट्रॅंगलमध्ये जहाजं ओढल्यासारखी जातात तसे पक्षी इथे येतात. जतिंगा दरी एका भयानक सिनेमासारखी आहे. इथे पक्षी चिवचिवाट करत नाहीत. ते उडत नाहीत, वाऱयाशी खेळत नाहीत, वर्षानृत्यही करत नाहीत. ते गाऊ शकत नाहीत, उडू शकत नाहीत. आजूबाजूच्या उघडय़ा हिरव्या जमिनीवरच्या आकाशाकडे झेपावत नाहीत. मृत्यू जणू त्यांची वाट पाहत असतो. पक्षी वैज्ञानिकांना वाटतं की, येथील जमिनीखालील चुंबकीय अस्तित्व पक्ष्यांच्या या वागण्याला कारणीभूत आहे.
पक्षी आत्महत्या करतात हे फारच आश्चर्यकारक आहे, परंतु या खेडय़ात पक्षी खूप वेगाने उडत येतात आणि एखाद्या इमारतीवर वा झाडावर धडकतात आणि मरतात. याहीपेक्षा विचित्र गोष्ट ही की, हे फक्त संध्याकाळी सात ते दहाच्या दरम्यान होतं. सामान्य हवामानात पक्षी दिवसा बाहेर पडतात आणि रात्र झाली की, घरटय़ात परततात. या आत्महत्येच्या चढाओढीत सुमारे 44 प्रकारचे स्थानिक आणि स्थलांतरित पक्षी दिसतात. नैसर्गिक कारणांमुळे 1 हजार 200 जतिंगा जमाती शेती करण्यात वा काही जोडधंदा करण्यात मग्न असतात. इतर वेळीसुद्धा बोरेल पर्वतरांगांमध्ये असलेल्या या निसर्गरम्य खेडय़ात रात्री शिरण्यास मनाई आहे.

असा विश्वास आहे की, पक्षी खालचे दिवे पाहून त्या दिशेने झेपावतात आणि जमिनीवर वा बांबूंवर आपटून मरतात. खाली पडल्यावर ते जिवंत असले तरी अन्नपाणी घेत नाहीत आणि मरणं पसंत करतात. हे तर न समजण्यासारखं आहे की, फक्त दिवसा उडणारे पक्षी रात्री का उडतात? जेव्हा नैऋत्येकडून ईशान्येकडे जाणारी हवा बोरेल दरीत याउलट वाहते, तेव्हा हे पावसाळय़ाच्या शेवटी घडतं. याशिवाय हे संपूर्ण जतिंगा रिजवर नाही, तर फक्त 1.5 किमी लांब ते 200 मीटर्स रुंद या पट्टय़ातच घडतं.

एकूणच असं का घडतं याचं उत्तर अनेक पक्षी वैज्ञानिकांच्या खूपशा संशोधनातूनही अजून कुणालाच सापडलेलं नाही. लोकांनी या पट्टय़ाच्या दक्षिण भागावर दिवे लावले तर तिकडे पक्षी आले नाहीत. लांबून येणारे स्थलांतरित पक्षी इथे आकर्षित होत नाहीत, तर फक्त जवळच्या भागातील पक्षी होतात. इथल्या अंधश्रद्धाळू नागा रहिवाशांनी या महिन्यांमध्ये तर पक्ष्यांना पकडण्याचा आनंदोत्सव सुरू केला. त्यामुळे या काळात इथल्या लोकांना भरपूर खायला मिळतं.
शास्त्र्ाज्ञ आणि पक्षी वैज्ञानिक काही विशिष्ट महिन्यांतच जतिंगातील पक्षी असे का वागतात याचा शोध घेत आहेत. 1910 पासून आत्महत्येचं सत्र सुरू आहे. ब्रिटिश चहाचा मळेवाला आणि पक्षी वैज्ञानिक ई. पी. गी याने या विषयावर पहिलं पुस्तक लिहून 1957 मध्ये प्रसिद्ध केलं आणि त्यानंतर ते जगाला समजलं. आपल्या देशातील आणि इतर देशांतूनही अनेकांनी यावर संशोधन केलं आहे, पण याचं कारण अजूनही समजलेलं नाही. हे असं होतं, मात्र जगात फक्त जतिंगामध्येच.

[email protected]