राम मंदिर भूमिपूजन सोहळ्यावेळी दोन गटात हाणामारी, सोनितपूर मध्ये कर्फ्यू लागू

1277

आसाममधील सोनितपूर येथे रामजन्मभूमी मंदिर भूमिपूजन सोहळ्यादरम्यान दोन गटात हाणामारी झाली. यानंतर सोनितपूरच्या दोन भागांमध्ये कर्फ्यू लागू करण्यात आला आहे. कर्फ्यू लागू करण्यात आलेल्या भागात लष्कराच्या जवानांनी गुरुवारी फ्लॅग मार्च काढला.

सोनितपूर अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की, बुधवारी रामजन्मभूमी मंदिराच्या भूमिपूजनानिमित्त कार्यकर्त्यांनी रॅली काढली. या दरम्यान दोन गटात वाद झाला. अचानक परिस्थिती अस्थिरतेत बदलली. यानंतर दोन विभागात कर्फ्यू लागू करण्यात आला आहे.

सोनीतपूरचे अप्पर पोलीस अधीक्षक (एएसपी) नुमल महता म्हणाले की, जिल्ह्यातील थलमारा व ढेकियाजुली पोलीस ठाण्याच्या हद्दीत अनिश्चित काळासाठी कर्फ्यू लागू करण्यात आला आहे. जिल्हा प्रशासनाच्या विनंतीवरून लष्कराच्या जवानांनी फ्लॅग मार्च काढला. परिस्थिती नियंत्रणात आहे. याप्रकरणी दोन जणांना ताब्यात घेण्यात आले आहे.

एएसपी नुमल महता म्हणाले की दोन्ही बाजूचे सुमारे 10 लोक जखमी झाले आहेत. त्याचवेळी बजरंग दल यांचे म्हणणे आहे की त्याचे किमान 12 कार्यकर्ते जखमी झाले आहेत. हाणामारीची माहिती मिळताच आसामचे एडीजी (कायदा व सुव्यवस्था) ज्ञानेंद्र प्रताप सिंह यांना कर्फ्यू भागात भेट देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. ते सोनितपूरला पोहोचत आहे.

बुधवारी संध्याकाळपासून सोनितपूरचे पोलीस अधीक्षक मुग्धज्योती देव महंताही घटनास्थळी तळ ठोकून आहेत. भोरा सिंगोरी येथील एका मंदिरात जोरात संगीत वाजू लागलं आणि प्रभू श्रीराम यांचा जयघोष झाल्यानंतर हा गोंधळ सुरू झाला. यावेळी, दुसऱ्या गटाने हरकत घेतल्याने दुचाकीस्वार कार्यकर्ते भडकले. त्यानंतर दोन्ही गट भिडले.

आपली प्रतिक्रिया द्या