महाबळेश्वरच्या माजी नगरसेविकेसह कुटुंबावर प्राणघातक हल्ला

माजी नगरसेविका श्रद्धा रोकडे यांच्यासह त्यांच्या कुटुंबावर सोमवारी रात्री मेटतळे येथे प्राणघातक हल्ला करण्यात आला. यात पाचजण जखमी झाले आहेत. याप्रकरणी पोलिसांनी मुख्यमंत्री शिंदे गटाचा माजी नगरसेवक कुमार शिंदे, त्याचा भाऊ योगेश शिंदे यांच्यासह 18 जणांवर गुन्हा दाखल केला असून, योगेशला अटक केली आहे. या घटनेने महाबळेश्वरमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

मुख्यमंत्री शिंदे यांचा माणूस आणि ठाण्याचा माजी नगरसेवक मदन कदम याने दोन दिवसांपूर्वी पाटण तालुक्यात केलेल्या गोळीबारात दोघांचा मृत्यू झाला होता. ही घटना ताजी असतानाच सोमवारी रात्री शिंदे गटाचा माजी नगरसेवक कुमार शिंदे आणि त्याचा भाऊ योगेश शिंदे यांच्या टोळीने रोकडे कुटुंबावर हल्ला केला. या घटनांमुळे सातारा जिह्यात कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे.

महाड येथील चवदार तळय़ावर जाण्यापूर्वी रोकडे कुटुंबीयांनी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन केले. आपल्याआधी रोकडे यांनी अभिवादन केल्याचा राग योगेशला आला. त्यामुळे योगेश महाडला पोहोचला. तेथे शिंदे टोळी आणि रोकडे कुटुंबीयांमध्ये बाचाबाची झाली. यावेळी योगेशने श्रद्धा रोकडे यांचे पती उमेश रोकडे यांना धमकी दिली होती. त्यानंतर शिंदे टोळी मेटतळे येथे येऊन दबा धरून बसली. रात्री साडेआठच्या सुमारास रोकडे कुटुंबीय महाबळेश्वरकडे निघाले. त्यावेळी ‘गोकुळ’ ढाब्याजवळ शिंदे टोळीने त्यांच्यावर तलवार, हॉकीस्टीक, पाइप, काठीने हल्ला चढविला. या हल्ल्यात मीरा रोकडे (वय 55), दीपक भट (वय 43) या दोघांवर तलवारीने वार करण्यात आले,  तर रमेश रोकडे (वय 58), उमेश रोकडे (वय 38) हे जखमी झाले. रात्री उशिरा उमेश रोकडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून महाबळेश्वर पोलिसांनी शिंदे टोळीचा मुख्य सूत्रधार योगेश शिंदे, कुमार शिंदे, संजय शिंदे, बबलू पारठे यांच्यासह 18 जणांवर गुन्हा दाखल केला.

घटनेची माहिती समजताच पोलीस निरीक्षक संदीप भागवत यांनी अतिरिक्त पोलीस संरक्षण मागविले. रात्री उशिरा वाई, भुईंज, पाचगणी, मेढा आणि सातारा येथील पोलीस अधिकारी महाबळेश्वरात दाखल झाले. वाईच्या उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. शीतल जान्हवी-खराडे यांनीही घटनेची माहिती घेतली.

शिंदे टोळीवर अनेक गुन्हे दाखल

 शिंदे टोळीचा सूत्रधार योगेश शिंदे आणि कुमार शिंदे यांच्यावर महाबळेश्वर पोलीस ठाण्यात अनेक गुह्यांची नोंद आहे. या दोघांवर तडीपारीचा प्रस्ताव तयार करण्यात आला होता. मात्र, त्याची अंमलबजावणी झाली नव्हती. कुमार शिंदे हा स्थानिक पालिका राजकारणात सक्रिय असून, त्याच्या नगरसेवक काळात झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी अंतिम टप्प्यात आहे. दोन महिन्यांपूर्वीच कुमार शिंदे व त्याची पत्नी माजी नगराध्यक्षा स्वप्नाली शिंदे यांनी कराड येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात जाहीर प्रवेश केला होता.