जनमानसाची भावना वेगळी आहे. लोकसभा निवडणुकीत शांत बसून संयमाने महाविकास आघाडीच्या 31 जागा विजयी केल्या याचे मुख्य कारण लोकांना बदल हवाय. आता राज्याची निवडणूक आहे आणि लोकांचा मूड जो दिसतोय काही झाले तरी महाराष्ट्रासह राज्यात परिवर्तन करायचे. हे परिवर्तन करत असताना राष्ट्रवादी कॉँग्रेस, कॉँग्रेस आणि उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील शिवसेना या सगळय़ांनी एकत्र जायचा निर्णय घेतल्यानंतर लोक आम्हाला साथ आणि शक्ती देतील, असा विश्वास राष्ट्रावादी कॉँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केला.
आता विधानसभा निवडणूक आहे. ठिकठिकाणी सहकारी भेटत आहेत. एक दिवस असा जात नाही कुठल्या ना कुठल्या जिह्यात, तालुक्यात लोकांच्या मनात काम करणारे जाणकार लोक त्यांचा पक्ष सोडतायत आणि सोबत येण्याची भूमिका घेतायत. हेतू हा की त्यांना महाराष्ट्रात परिवर्तन हवे आहे. राज्यभरात महायुतीच्या विरोधात जनतेत प्रचंड रोष आहे. सरकार आणण्यासाठी सामूहिक प्रयत्न करावे लागतील. दोन महिने हातात आहेत. त्याचा उपयोग परिवर्तनासाठी करा. शेवटच्या माणसापर्यंत जा, आपली विचारधारा पटवून द्या, असे आवाहन शरद पवार यांनी केले. महात्मा ज्योतिराव फुले शिक्षक परिषदेचे प्रदेश अध्यक्ष व्यंकटराव जाधव व त्यांच्या सहकारी मुंबईत आज शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी कॉँग्रेसमध्ये प्रवेश केला.
लोकांमध्ये खूप अस्वस्थता
एखाददुसरा गंभीर प्रसंग आला, तर लोकांची प्रतिक्रिया किती तीव्र असते, याचे उदाहरण काल ठाणे जिह्यातील बदलापूर येथे पाहिले. सकाळी 6 ते रात्री 9 वाजेपर्यंत हजारोंच्या संख्येने लोक रस्त्यावर येतात, दळणवळण थांबवतात. याचा अर्थ लोकांमध्ये खूप अस्वस्थता आहे आणि त्यांना परिवर्तन हव आहे, असे शरद पवार म्हणाले.