विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता सुरू झाल्यानंतर जिह्यात बेहिशेबी मालमत्ता बाळगणाऱया व्यक्तींचा शोध घेऊन कारवाई सुरू करण्यात येत आहे. त्या अनुषंगाने संगमनेर शहरामध्ये हवाल्याची बेहिशेबी 42 लाख 15 हजारांची रोख रक्कम स्थानिक गुन्हा शाखेच्या पथकाने हस्तगत केली आहे.
संगमनेरमधील सहदेव ज्वेलर्स येथे भावेश पटेल व आशिष सुभाष वर्मा हे त्यांच्या साथीदारांसह त्यांच्या उत्पन्नापेक्षा जास्त रोख रकमेची हवालामार्फत विल्हेवाट लावत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखा व श्रीरामपूरच्या पोलीस पथकाने सहदेव ज्वेलर्सच्या वरच्या मजल्यावर जाऊन खात्री केली. यावेळी त्यांना मुकेशकुमार रमेशभाई पटेल व धवलकुमार जसवंतभाई पटेल (दोघे रा. जि. मेहसाना, गुजरात) आढळले. या दोघांकडे रोख रकमेबाबत चौकशी केली असता त्यांनी ही रक्कम हवाल्याची असून, भावेश पटेल व आशिष वर्मा यांची असल्याचे सांगितले. पोलीस पथकाने चौकशी केली असता मुकेशकुमार व धवलकुमार पटेल याच्याकडे असलेली रक्कम बेकायदेशीर मार्गाने जमवून, शासनाचा कर चुकवून हवाल्यामार्फत विल्हेवाट लावण्याकरिता आल्याची खात्री झाली. पोलिसांनी मुकेशकुमार पटेल याच्या ताब्यातून 40 लाख 26 हजार, तर धवलकुमार पटेल याच्याकडून 1 लाख 89 हजार अशी एकूण 42 लाख 15 हजारांची रक्कम जप्त केली. रोख रकमेबाबत कायदेशीर कारवाई सुरू होती.