
विधान भवनाच्या आवारात गुरुवारी जी घटना (‘जोडे मारो’ आंदोलन) घडली, ती अत्यंत चुकीची होती याबद्दल कोणाच्याही मनात दुमत नाही. यासंदर्भात सभागृहातील आणि सभागृहाबाहेरील माहिती तपासून घेऊन उद्या, (शनिवारी) यासंदर्भात योग्य ती कारवाई करण्यासंदर्भात निर्णय घेतला जाईल, असे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आज सांगितले, पण आज सभागृहात काही सदस्यांकडून पंतप्रधानांबाबत जे वक्तव्य करण्यात आले, तेही चुकीचे असून तेदेखील शोभनीय नाही असे मत व्यक्त केले.
काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांच्या विरोधात विधान भवनाच्या पायऱयांवर सत्ताधारी पक्षाच्या आमदारांनी गुरुवारी आंदोलन पुकारले होते. सत्ताधारी पक्षातील काही आमदारांनी राहुल गांधी यांच्या पोस्टरला जोडे मारले. आज विधानसभेचे कामकाज सुरू होताच काँग्रेसच्या आमदारांनी आक्रमक पवित्रा घेतला. काँग्रेसचे नाना पटोले यांनी या सर्व प्रकरणाबद्दल नाराजी व्यक्त केली. हा सर्व प्रकार गंभीर असून काल झालेल्या आंदोलनामध्ये तालिका अध्यक्षांचाही समावेश असल्याने त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी पटोले यांनी केली.
श्वेता पवार