आमदारांच्या वर्तणुकीसाठी 15 दिवसांत मार्गदर्शक तत्त्वे

विधान भवनाच्या पायऱयांवर काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या पोस्टरवर झालेल्या जोडो मारो आंदोलनच्या पार्श्वभूमीवर आमदारांच्या सभागृहातील आणि सभागृहाबाहेरील वर्तणुकीसाठी येत्या 15 दिवसांत मार्गदर्शक तत्त्वे जाहीर करण्यात येणार असल्याची घोषणा विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आज विधानसभेत केली. गोंधळ घालणाऱया जबाबदार सदस्यांना लेखी ताकीद देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

काँग्रेसचे नेते अध्यक्ष राहुल गांधी यांच्या पोस्टरला केलेल्या जोडो मारो आंदोलन आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात सभागृहात झालेल्या आक्षेपार्ह विधानाबद्दल जबाबदार आमदारांवर कारवाई करावी, अशी मागणी विरोधी पक्षनेते अजित पवार, काँग्रेसचे ज्येष्ठ सदस्य बाळासाहेब थोरात, नाना पटोले व इतर सदस्यांनी केली होती. त्यावर निर्णय जाहीर करण्यात येईल, असे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी जाहीर केले होते.

या कारवाईसाठी सकाळी महाविकास आघाडीच्या सदस्यांनी आक्रमक पवित्रा धारण करीत दिवसभर सभात्याग केला. अखेर सभागृहाचे कामकाज संपण्यापूर्वी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी वरील घोषणा केली. या मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लघंन झाल्यास योग्य ती कारवाई करण्याचा इशाराही त्यांनी यावेळी दिला.

यावेळी बोलताना राहुल नार्वेकर म्हणाले की, या दोन्ही प्रकरणांतील जबाबदार कारवाई करण्यासंदर्भात गटनेते, प्रतोद, विरोधी पक्षनेते अजित पवार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमवेत बैठक घेण्यात आल्याची माहिती त्यांनी सभागृहाला दिली. तर विधानसभेच्या पायऱयांवर, सभागृहाबाहेर अनेक सदस्य आंदोलन करतात, आक्षेपार्ह घोषणाबाजी व वर्तणूक करतात. त्यामुळे काही अप्रिय घटना घडतात. त्याचे पडसाद सभागृहात उमटतात. अशा घटनांची दखल माध्यमांमध्येही घेतली जाते. त्यामुळे सदस्यांच्या वर्तनाबद्दल जनमानसात चुकीचा संदेश जातो व सभागृहाची प्रतिमा मलिन होते. त्यामुळे यासंदर्भात विचार करण्याची गरज असून त्या अनुषंगाने सभागृहात आणि सभागृहाबाहेर कसे वर्तन करावे यासाठी चिंतन करण्याची गरज असल्याचे मत असल्याचे मत राहुल नार्वेकर यांनी यावेळी व्यक्त केले.

आमदारांना लेखी ताकीद
23 मार्च रोजी विधानसभेच्या आवारात जी काही आक्षेपार्ह घटना घडली. यासंदर्भात विरोधी पक्षनेते आणि काही सदस्यांनी मुद्दा उपस्थित केला होता. त्यानुसार जबाबदार सदस्यांना लेखी ताकीद देण्यात येणार असल्याची घोषणा विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शनिवारी विधानसभेत केली. तसेच सभागृहात देश व राज्य पातळीवरील संवैधानिक पदे धारण करणाऱया काही मान्यवरांबद्दल सभागृहात आक्षेपार्ह वक्तव्य करण्यात आले. त्या सदस्यांनाही लेखी ताकीद देण्यात येणार असल्याचे यावेळी जाहीर केले.