निवड चाचणीत सहभागी झाले नसल्याने वरिष्ठ खेळाडूंना वगळले – अ‍ॅड. आस्वाद पाटील

489

चिपळूण येथे झालेल्या राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी कबड्डी स्पर्धेत जे खेळाडू खेळले नाहीत त्यांची 67 व्या राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेसाठी निवडण्यात आलेल्या महाराष्ट्रच्या संघात निवड करण्यात आलेली नाही. जे खेळाडू निवड चाचणी स्पर्धेत खेळले त्यांची निवड महाराष्ट्रच्या संघात करण्यात आली आहे, अशी माहिती महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनचे सरकार्यवाह अ‍ॅड. आस्वाद पाटील यांनी दिली.

67 वी राष्ट्रीय कबड्डी स्पर्धा राजस्थानमधील जयपूर येथे 2 ते 6 मार्च या कालावधीत खेळली जाणार आहे. या स्पर्धेसाठी निवडण्यात आलेल्या महाराष्ट्राच्या पुरूष व महिला संघांचे सरावशिबीर अलिबाग तालुक्यतील आवास येथे आयोजित करण्यात आले होते. या सरावशिबीराला अ‍ॅड. आस्वाद पाटील यांनी भेट दिली त्यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते. प्रो-कबड्डी स्पर्धेत खेळल्यामुळे खेळाडूंची महाराष्ट्राच्या संघात निवड करण्यात आली नाही हा आरोप केला जात आहे तो चुकीचा आहे. नाशिक येथे झालेल्या निवडचाचणी स्पर्धेच्या कालावधीत प्रो कबड्डी स्पर्धा सुरू होती. त्या स्पर्धेत खेळाडू खेळत होते. त्यामुळे निवडचाचणीत हे खेळाडू खेळले नाही हे मान्य आहे. त्यावेळी निवड चाचणीत न खेळताही या सिनीयर खेळाडूंची महाराष्ट्राच्या संघात निवड करण्यात आली होती. परंतु चिपळूण येथे झालेल्या निवड चाचणी स्पर्धेच्या वेळी प्रो – कबड्डी स्पर्धा नव्हती तरीही सिनीयर खेळाडू या निवड स्पर्धेत खेळले नाहीत. जे सिनीयर खेळाडू राज्य निवड चाचणीत खेळले नाहीत त्यांची निवड महाराष्ट्रच्या संघात केली नाही, असे अ‍ॅड. आस्वाद पाटील यांनी स्पष्ट केले.

जे खेळाडू चिपळूण येथे झालेल्या राज्य निवड चाचणी स्पर्धेत खेळले त्यांच्यातूनच महाराष्ट्राचा संघ निवडण्यात आला आहे. यंदा राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवडण्यात आलेल्या संघात नवोदित खेळाडू आहेत. हे सर्व खेळाडू चांगले खेळतील. या तरुण खेळाडूंना घेऊन संघ बांधणी केली जाणार आहे. या खेळाडूंसाठी वर्षातून तीन वेळा सराव शिबीर आयोजित करण्यात येणार आहे. याचे परिणाम आता दिसले नाहीत तरी भविष्यात चांगले दिसतील, असे अ‍ॅड. पाटील म्हणाले. महाराष्ट्राच्या खेळाडूंनी चांगला खेळ करावा. खेळाबरोबरच शिस्त पाळावी. आपल्या वर्तनामुळे माराष्ट्राचे नाव बदनाम होणार नाही याची काळजी खेळाडूंनी घेतली पहिजे. तशा सूचना खेळाडूंना देण्यात आल्या आहेत, असे अ‍ॅड. पाटील यांनी सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या