जेष्ठ चित्रपट व नाट्य अभिनेते भालचंद्र कुलकर्णी यांचे निधन

मराठी चित्रपटसृष्टीतील जेष्ठ चित्रपट व नाट्य अभिनेते भालचंद्र कुलकर्णी यांचे अल्पशा आजाराने राहत्या घरी निधन झाले आहे. आज शनिवारी सकाळी 6 वाजता वयाच्या ८८ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते. कोल्हापूरमधील कळंबा येथील शिवप्रभू नगर मधील निवासस्थानापासून सकाळी साडेअकराच्या सुमारास अंत्ययात्रेस सुरुवात होणार आहे. तर दुपारी बारा वाजता पंचगंगा मुक्तीधाम येथे अंत्यसंस्कार होणार आहेत.

झुंज तुझी माझी, हळद रुसली कुंकू हसले, जावयाची जात यासारख्या 300 हून अधिक चित्रपटात त्यांनी अनेक भुमिका साकारल्या आहेत. कुलस्वामिनी अंबाबाई चित्रपटातील ‘चांगभलं रं चांगभलं, देवा ज्योतिबा चांगभलं’ हे गाणं त्यांच्या चित्रित झाले होते. हे गाणे खूप गाजलं होतं. अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळातर्फे त्यांना चित्रभूषण पुरस्काराने गौरवण्यात आले होते. तसेच अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळातही त्यांनी विविध पदांवर काम केले असून,कलाकारांच्या अनेक प्रश्नावर त्यांनी आवाज उठविला आहे.