देव आपणात आहे! निधर्मी मूल्य मानणाऱ्या नागरिकांचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र

कोरोनाच्या संकटात नागरिकांचे आरोग्यहित लक्षात घेऊन मंदिरे न उघडण्याची ठाम भूमिका घेणारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निधर्मी मूल्ये मानणाऱ्या लोकांनी अभिनंदन केले आहे.

‘देव देव्हाऱ्यात नाही, देव मूर्तीत ना मावे, तीर्थक्षेत्रात ना गावे, देव आपणात आहे. शीर झुकवोनिया पाहे…’ अशा माणसांच्या श्रद्धेला व्यापक करणाऱ्या परंपरेचे स्मरण करत निधर्मी लोकांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले आहे. हे पत्र सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

अनलॉकच्या टप्प्यात राज्यातील मंदिरे उघडली जावीत यासाठी भाजपने आंदोलन केले. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी ‘सेक्युलॅरिझम’चा संदर्भ घेऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना वादग्रस्त पत्र लिहिले. मुख्यमंत्र्यांनी राज्यपालांच्या पत्राला खणखणीत प्रत्युत्तर देत नागरिकांच्या आरोग्यासाठी मंदिरे न उघडण्याची भूमिका घेतली. मुख्यमंत्र्यांच्या या भूमिकेचे सर्व स्तरांतून कौतुक झाले.

या सर्व पार्श्वभूमीवर सेक्युलर विचारांच्या लेखक, विचारवंत, प्राध्यापक, शिक्षणतज्ञ, आरोग्यतज्ञ, उद्योजक, पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते, अर्थतज्ञ, अभियंते आदी मंडळींनी मुख्यमंत्र्यांच्या नावे पत्र लिहिले आहे. हे पत्र सोशल मीडियावर व्हायरल होत असून पत्राखाली स्वतःचे नाव लिहून, ते मोठय़ा प्रमाणात शेअर आणि फॉरवर्ड केले जात आहे.

cm-letter-secularism

या पत्रात राज्यपालांनी मंदिरे उघडण्यासाठी टाकलेला दबाब आणि ‘सेक्युलॅरिझम’ला दाखवलेला उघड विरोध याबद्दल निधर्मी लोकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. लोकांच्या श्रद्धांचा राजकारणासाठी केलेला असा उपयोग आक्षेपार्ह वाटतो. श्रद्धांचा उपयोग करून केलेले राजकारण यशस्वी झाले आणि देवळे उघडली गेली तर ते भाविकांसाठी धोक्याचे ठरू शकते, असे पत्रात म्हटले आहे.

जेव्हा प्रश्न श्रद्धांचा असतो तेव्हा अशी ठाम भूमिका राजकीयदृष्टय़ा कठीण असते, तरी आपण ती ठामपणे घेतली आणि सेक्युलॅरिझमच्या बाजूने उभे राहिलात आणि त्याची राज्यपालांनादेखील स्पष्ट शब्दांत जाणीव करून दिलीत. याबद्दल आम्ही आपले मनःपूर्वक अभिनंदन करतो, अशा शब्दांत मुख्यमंत्र्यांचे आभार मानण्यात आले आहेत. या पत्रावर भालचंद्र नेमाडे, रंगनाथ पठारे, शांता गोखले, निरजा, सुभाष वारे, विश्वास उटगी, नीला लिमये, डॉ. जयेंद्र परुळेकर यांच्यासह 104 जणांची नावे आहेत.

शासनाची भूमिका लोकहितावर ठरावी

घटनेतील धर्मस्वातंत्र्यासंबंधीचे कलम 25 आरोग्याला बाधा येत असल्यास आवश्यक ते प्रतिबंध धर्म-स्वातंत्र्यावर लावण्याचा अधिकार सरकारला देते. सेक्युलर माणूस धार्मिक असू शकतो. श्रद्धाळूही असू शकतो. पण शासनाची भूमिका या श्रद्धेमुळे न ठरता लोकांचे ऐहिक हित लक्षात घेऊन ठरली पाहिजे असे हा सेक्युलर माणूस मानतो, असे पत्रात लिहिले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या