मित्राला एटीएम कार्ड देणं पडलं महागात, परस्पर 2 लाख 80 हजार काढून फसवणूक

प्रातिनिधिक फोटो

स्वतःचे एटीएम कार्ड मित्राकडे ठेवल्याचा फटका लातूर येथील एका व्यक्तिला सहन करावा लागला आहे. त्या मित्राने तब्बल 2 लाख 80 रुपये परस्पर काढून घेऊन फसवणूक केली असून या प्रकरणी औसा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या फसवणुकी प्रकरणी मुकुंद व्यंकट झिरमीरे (रा.कन्हेरी ता. औसा) यांनी औसा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. मुकुंद यांचे औसा येथील आयसीआयसीआय बँकेच्या शाखेत खाते आहे. किसान क्रेडीट कार्ड द्वारे बँकेने 3 लाख 37 हजार 236 रुपयांचे कर्ज त्यांना मंजूर केलेले होते. सदरील रक्कम त्यांच्या बँकेच्या खात्यात जमा केलेली होती. एटीएममधून पैसे काढता येत नसल्याने त्यांनी गावातील मित्र हंसराज वसंत आळंगे याला सोबत घेऊन बँकेच्या एटीएममध्ये नेले. त्याच्या मदतीने पैसे काढले. मात्र त्याने एटीएम कार्ड स्वतःजवळ ठेवून घेतले. जेव्हा पैसे लागतील तेव्हा मला सांग मी काढून देतो, असे त्याने मुकुंद यांना सांगितले.

मित्र असल्याने मुकुंद यांनीही त्याचे एटीएम कार्ड त्याच्याजवळ ठेवले. नंतर एटीएम कार्डची मागणी केल्यानंतर त्याने टाळाटाळ केली. एटीएम कार्ड मिळवल्यानंतर मुकुंद यांनी बँकेतून पैसे काढण्यासाठी बँकेत गेल्यानंतर खात्यावर पैसे नसल्याचे सांगण्यात आले. 2 लाख 80 हजार रुपये एटीएमच्या माध्यमातून हंसराज वसंत आळंगे यानेच परस्पर काढून घेतले व मुकुंद झिरमिरे यांची फसवणूक केल्याचे निदर्शनास आले. औसा पोलीस ठाण्यात या प्रकरणी हंसराज आळंगे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या