भंडारा: एटीएममधून १००च्या ऐवजी निघाल्या ५००च्या नोटा

22

सामना ऑनलाईन । तुमसर

भंडारा जिल्ह्यातील तुमसरमध्ये बँक ऑफ बडोदाच्या एटीएममधून १००च्या नोटांऐवजी ५००च्या नोटा बाहेर येत होत्या. यामुळे कोणी ४ हजार रुपये काढले तर १००च्या ४० नोटांऐवजी ५००च्या ४० नोटा मिळत होत्या. या प्रकारामुळे ५००च्या नोटा वेगाने संपायच्या आणि १००ची एकही नोट ग्राहकांना मिळत नव्हती. एटीएममध्ये १००च्या नोटांच्या स्वरुपात मोठी रक्कम असूनही ५००च्या नोटा संपल्यावर पैसे संपल्याचा संदेश दिसू लागला. एटीएममध्ये पैसे भरण्यासाठी गेलेल्या पथकाला हा प्रकार लक्षात आला.

एटीएममधून दिवसभरात तांत्रिक घोळामुळे तब्बल साडेचार लाख रुपये जास्त काढले गेले होते. सगळा प्रकार उघड होताच बँक मॅनेजर पी. व्ही. कांबळे यांनी सीसीटीव्ही फूटेज तपासले आणि संबंधित ग्रहाकांशी संपर्क साधून जास्तीची रक्कम बँकेत भरण्यास सांगितली. काही ग्राहकांनी रक्कम भरली. मात्र काही ग्राहकांनी एटीएममधून आलेल्या स्लीपवर जेवढी रक्कम काढायला गेलो होतो तेवढीच छापून आल्याचे दाखवले आणि जास्तीचे पैसे आमच्याकडे नाही असे सांगायला सुरुवात केली. ग्राहकांच्या या पवित्र्यामुळे उरलेली जास्तीची रक्कम कोण भरणार असा प्रश्न निर्माण झाला आहे. एटीएममध्ये झालेल्या बिघाडाप्रकरणी नेमकी कोणावर कारवाई होणार हे देखिल गुलदस्त्यातच आहे.

आपली प्रतिक्रिया द्या