‘वाळवी’च्या भव्य यशानंतर परेश मोकाशी पुन्हा एकदा एक नवीन लेखन घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. 73 वा बर्लिन आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात निवड झालेल्या ‘आत्मपॅम्फ्लेट’ या चित्रपटाचा टीझर नुकताच प्रदर्शित झाला. चित्रपटाच्या नावामागच्या वेगळेपणाचे उत्तर 6 ऑक्टोबरला मिळेल.
आशीष अविनाश बेंडे दिग्दर्शित या चित्रपटात ओम बेंडखळे, प्रांजली श्रीकांत, भीमराव मुडे आणि केतकी सराफ यांच्या प्रमुख भूमिका आहेत. दिग्दर्शक आशीष अविनाश बेंडे म्हणतात, ‘‘खूप साधी, सरळ आणि मनाला भावणारी अशी ही कथा आहे. ‘आत्मपॅम्फ्लेट’मधील पात्रांपैकी एखादे पात्र तरी बालपणी आपल्यात, आपल्या मित्रमैत्रिणींत दडल्याचे प्रेक्षकांना जाणवेल. एखाद्या फास्ट रोलर कोस्टर राइडसारखी तिरकस विनोदी शैली चित्रपटाची आहे. ’’
चित्रपटाचे लेखक परेश मोकाशी म्हणतात, ‘आत्मपॅम्फ्लेट’ म्हणजे आपल्या शालेय आयुष्यात क्वचितच येऊन गेलेला सोपा पेपर आहे. आपल्यासारख्या छोटुकल्या लोकांच्या चरित्रातील ही टीनऐजची पाने तशी खूप खळबळजनक असतात. त्या वयात आपल्या मनात, जनात, कुटुंबात, देशात खळबळच खळबळ उडालेली आपल्याला दिसत असते. या खळबळीचा हा निखळ आनंद देणारा खेळ.’’