नवी मुंबई, सोलापूरसाठी एटीएसचे स्वतंत्र युनिट

65

सामना प्रतिनिधी, मुंबई

नवी मुंबई आणि सोलापूर शहराची दिवसेंदिवस वाढत जाणारी व्याप्ती लक्षात घेता या दोन्ही शहरांसाठी दहशतवादविरोधी पथकाचे स्वतंत्र युनिट स्थापन करण्याचा निर्णय गृहविभागाने घेतला आहे. त्यासाठी स्वतंत्ररीत्या पोलीस अधिकारी व कर्मचारीदेखील देण्यात येणार आहेत.

दहशतवादविरोधी पथक ठाणे युनिटच्या कार्यक्षेत्रातच आतापर्यंत नवी मुंबई पोलीस आयुक्तालय व कोकण परिक्षेत्रातील सर्व जिल्हय़ांचा समावेश होतो. तसेच दहशतवादविरोधी पथक पुणे युनिटच्या कार्यक्षेत्रात पुणे पोलीस आयुक्तालय, सोलापूर पोलीस आयुक्तालय व कोल्हापूर परिक्षेत्रातील सर्व जिल्ह्यांचा समावेश होतो. राज्याच्या पोलीस महासंचालकांनी या दोन्ही शहरांसाठी स्वतंत्र युनिट स्थापन करण्याची विनंती राज्य सरकारला केली होती. या विनंतीनुसार गृहविभागाने नवी मुंबई तसेच सोलापूर शहरासाठी दहशतवादविरोधी पथकाचे स्वतंत्र युनिट स्थापन करण्यास मंजुरी दिली आहे. नवी मुंबई युनिटसाठी दोन पोलीस निरीक्षकांसह ३८ पदे तर सोलापूर युनिटसाठी एका पोलीस उपनिरीक्षकासह १७ पदे स्थानांतरणाने उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या