अमरनाथ यात्रेकरूंवर हल्ल्याची जबाबदारी लश्कर-ए-तोयबाने स्वीकारली, मास्टरमाइंड पाकिस्तानीच

फाईल फोटो

सामना ऑनलाईन । श्रीनगर

जम्मू-कश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यात अमरनाथ यात्रेकरूंवर हल्ला झाल्यानंतर जम्मू-कश्मीरसह देशातील सर्व महत्वाच्या ठिकाणांना हाय अॅलर्ट देण्यात आला आहे. दरम्यान, जम्मू-कश्मीरचे पोलीस महानिरीक्षक मुनीर खान यांनी दिलेल्या माहितीनुसार अमरनाथ यात्रेकरूंवरील हल्ल्याची जबाबदारी दहशतवादी संघटना लश्कर-ए-तोयबाने घेतली असून हल्ल्याचा मास्टरमाइंड पाकिस्तानी दहशतवादी इस्माइल असल्याचे सांगण्यात आले.

कश्मीरमधील सर्व उच्चाधिकारी सुरक्षा यंत्रणाचे परिक्षण करत आहेत. उत्तर प्रदेशातील कावड यात्रेवर देखील पूर्ण लक्ष ठेवण्यात आले असून अत्यंत चोख व्यवस्था ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी तातडीची बैठक बोलावली असून त्यामध्ये जम्मू-कश्मीरमधील सुरक्षेचा आढावा घेण्यात येत आहे. या बैठकीला एनएसए अजित डोवल देखील उपस्थित असल्याचे म्हटले जात आहे. गृहमंत्रालयाचा एक गट श्रीनगरमध्ये दाखल झाला असून राज्यातील सर्व परिस्थितीची माहिती गृहमंत्रालयाकडे तातडीने पाठवण्यात येते आहे.

सोमवारी दक्षिण कश्मीरातील अनंतनाग जिह्यात बेटंगू येथे रात्री ८.२०च्या सुमारास हल्ला झाला. दहशतवाद्यांनी बेटंगू आणि खनाबल परिसरात पोलीस ताफ्यावर बेछूट गोळीबार केला. पोलिसांनी जोरदार प्रत्युत्तर दिले. त्याचवेळी अमरनाथ यात्रेकरूंच्या बसला दहशतवाद्यांनी टार्गेट केले. दहशतवाद्यांच्या गोळीबारात सातजणांचा मृत्यू झाला असून, ३२ जण जखमी झाले आहेत़ अमरनाथाचे दर्शन घेऊन हे यात्रेकरू परत येत होते. मृतांमध्ये ५ महिलांचा समावेश आहे. मृतांमधील ५ जण गुजरातचे रहिवासी आहेत. तर अन्य २ महिला महाराष्ट्राच्या पालघरमधील असून उषा सोनकर आणि निर्मला बेन ठाकोर अशी या दोघींची नावे आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या