चाळीसगाव शिवसेना शहरप्रमुखावर जीवघेणा हल्ला

56

सामना प्रतिनिधी । जळगाव

शिवसेना चाळीसगाव शहरप्रमुख नाना कुमावत यांच्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आला आहे. या हल्ल्यात कुमावत यांच्यासोबत उपशहरप्रमुख निलेश गायके व युवराज कुमावत हे गंभीर जखमी झाले आहेत. एका कार्यक्रमावरून परतत असताना त्यांच्यावर पाच-सहा जणांनी तलवारीने हल्ला केला. राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक अण्णा चिंधा कोळी यांच्या मुलांनी हा हल्ला केल्याची माहिती समोर येत आहे. हल्लेखोर घटनास्थळावरून फरार झाले.

चाळीसगाव शहरातील धुळे रस्त्यावर असलेल्या कॉलेज पॉर्इंटवर सोमवारी दुपारी घडली. राजकीय वैमनस्यातून हा हल्ला झाल्याचे जखमी उपशहरप्रमुख निलेश गायके यांनी सांगितले. शहरप्रमुख नाना कुमावत, त्यांचे बंधू युवराज कुमावत, उपशहरप्रमुख निलेश गायके व इतर शिवसेना पदाधिकारी वास्तुशांतीच्या कार्यक्रमाला एकत्र गेले होते. वास्तुशांतीच्या कार्यक्रमावरून कॉलेज रस्त्यावरून हे सर्व जण दुचाकीने येत होते. त्यावेळी एके ठिकाणी दबा धरून बसलेले सौरभ कोळी, सिद्धार्थ कोळी व त्यांच्यासोबत असलेल्या इतर पाच ते सहा जणांनी तलवार, चॉपरने कुमावत यांच्यावर हल्ला केला. कुमावत यांच्या दुचाकीवर मागे बसलेले त्यांचे लहान बंधू युवराज कुमावत यांनाही मारहाण करण्यात आली. कुमावत यांच्या मागून येणारे गायके यांच्यावरही हल्लेखोरांनी हल्ला करून त्यांनाही जबर जखमी केले. त्याचवेळी मागून येणाऱ्या इतर शिवसैनिकांनी हल्लेखारांचा काठ्या उगारून प्रतिकार केला. शिवसैनिक व पदाधिकाऱ्यांची गर्दी झाल्याने भ्याड हल्ला करणारे हल्लेखोर तेथून पसार झाले.

नाना कुमावत हे या हल्लायत गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना चाळीसगावातील खाजगी रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. तसेच युवराज कुमावत व निलेश गायके यांच्यावर चाळीसगाव रूग्णालयात उपचार सुरू आहेत. चाळीसगाव पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रकिया सुरू होती. हल्ल्याची माहिती मिळताच घटनास्थळी शिवसैनिकांनी एकच गर्दी केली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी बंदोबस्त लावला.

आपली प्रतिक्रिया द्या