
बांगलादेशातील हिंदुंवरील हिंसाचार थांबण्याचे नावच घेत नाही. कट्टरपंथियांकडून हिंदू मंदिरांना लक्ष्य करण्यात येत आहे. ढाका जिल्ह्यातील नमहट्टा इस्कॉन मंदिरावर शुक्रवारी पुन्हा एकदा हल्ला करण्यात आला आहे. इस्कॉन मंदिरात तोडफोड करत आग लावण्यात आली. मंदिरातील लक्ष्मी नारायण मूर्तीचे दहन करण्यात आले असून उर्वरित साहित्यही जळून खाक झाले आहे, असा आरोप इस्कॉन कोलकाता उपाध्यक्ष राधारमण दास यांनी केला आहे. समाजातील सदस्यांवर आणि वैष्णव धर्माच्या सदस्यांना सातत्याने लक्ष्य करत त्यांच्यावर हल्ले सुरू आहेत, असेही दास पुढे म्हणाले.
दास यांनी आपल्या एक्स हँडलवरील पोस्टमध्ये म्हटले आहे की, “बांगलादेशमध्ये इस्कॉन नमहट्टा सेंटर जळून खाक झाले. श्री श्री लक्ष्मी नारायण यांची मूर्ती आणि मंदिरातील सर्व वस्तू पूर्णपणे जळून खाक झाल्या आहेत. ढाका जिल्ह्यातील तुराग पोलिस स्टेशनच्या अखत्यारीतील धुर गावातील हरे कृष्ण नमहट्टा अंतर्गत येणाऱ्या श्री श्री राधा कृष्ण मंदिर आणि श्री श्री महाभाग्य लक्ष्मी नारायण मंदिराला शनिवारी पहाटे 2-3 वाजण्याच्या दरम्यान आग लावण्यात आली.”
सदर हल्ल्यांकडे अंतरिम सरकारचे लक्ष वेधूनही पोलीस आणि प्रशासनाला आपल्या तक्रारींचे निराकरण करण्यासाठी स्वारस्य नाही असा दावाही दास यांनी केला आहे. बांगलादेशात मोहम्मद युनूस यांच्या नेतृत्वाखालील अंतरिम सरकारच्या काळात अल्पसंख्याकांवर, विशेषतः हिंदूंवर सातत्याने हल्ले होत आहेत. इस्कॉनशी संबंधित असलेल्या चिन्मय कृष्ण दासला अटक केल्यानंतर बांगलादेशातील वातावरण अधिकच चिघळले आहे.
संहिता सनातनी जागरण जोतशी संबंधित चिन्मय कृष्ण दास याला 25 नोव्हेंबर रोजी ढाका येथे ‘देशद्रोहाच्या’ आरोपाखाली अटक करण्यात आली होती. हिंदू समुदायाच्या रॅलीमध्ये चिन्मय दास आणि इतरांवर बांगलादेशच्या राष्ट्रध्वजाचा अपमान केल्याचा आरोप करण्यात आला. याप्रकरणी स्थानिक राजकीय नेत्याने केलेल्या तक्रारीनंतर चिन्मय दास यांना अटक करण्यात आली.
हिंदू समाजावर कट्टरतावाद्यांचे हल्ले वाढले आहेत. ज्यावर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी बांगलादेशमध्ये संयुक्त राष्ट्र शांती मिशन तैनात करण्याची विनंती केली होती.