मनोरुग्ण प्राध्यापकाचा पत्नीसह, पोलीस आणि शिक्षकावर हल्ला

सासरवाडीला आलेल्या कोल्हापूर येथील मनोरुग्ण प्राध्यापकाने पत्नीच्या डोक्यात फरशी घालून जखमी केले. नंतर तालुका पोलीस स्टेशनमध्ये जाऊन एका पोलीस कर्मचाऱ्यासह एका शिक्षकावर चाकू हल्ला करून जखमी केले. ही घटना सोमवारी दुपारी घडली असून, याप्रकरणी श्रीरामपूर शहर आणि तालुका पोलिसांत वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

विनोद मच्छिंद्र बर्डे (वय 41, रा. मौनी विद्यापीठ, गारगोटी, कोल्हापूर) असे मनोरुग्ण प्राध्यापकाचे नाव आहे. शैला विनोद मच्छिंद्र बर्डे (पत्नी, वय 36), किशोर शिवाजी शिंदे (वय 34, जिल्हा परिषद शिक्षक, टाकळीभान) पोलीस संतोष रामकिशन बढे (वय 44, तालुका पोलीस स्टेशन) अशी जखमींची नावे आहेत.

विनोद बर्डे याचे 13 वर्षांपूर्वी राहाता तालुक्यातील चितळी गावातील शैला बर्डे हिच्याबरोबर लग्न झाले. त्याला एक मुलगा, एक मुलगी आहे. तो जीवशास्त्र्ा विषयाचा कोल्हापूर येथे प्राध्यापक आहे. दोन वर्षांपासून त्याच्यावर मनोविकारतज्ञ डॉक्टरांचे उपचार सुरू आहेत. दोन दिवसांपूर्वी तो सासरवाडी असलेल्या चितळी गावात कार्यक्रमानिमित्त आला होता.

सासरवाडीचे लोक मला मारणार आहेत म्हणून त्याने पोलीस व रुग्णवाहिकेला फोन केला. रुग्णवाहिका समोर दिसताच त्याने शेजारी असलेल्या फरशीचा तुकडा त्याने पत्नीच्या डोक्यात घातला. त्यानंतर तो तालुका पोलीस स्टेशनमध्ये गेला. पासपोर्ट व्हेरिफिकेशनसाठी आलेले शिक्षक शिंदे यांच्यावर त्याने चाकूने हल्ला केला. या हल्ल्यात शिंदे यांच्या दोन्ही कानांसह पाठीला जबर जखम झालेली आहे. पोलीस स्टेशनमध्ये असलेले पोलीस बढे यांनी त्याला अडवण्याचा प्रयत्न केला असता, त्याने बढे यांच्यावरही चाकू हल्ला केला. जखमींवर साखर कारखाना रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलिसांनी विनोद मच्छिंद्र बर्डे याला ताब्यात घेतले आहे.

दरम्यान, यापूर्वी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक समाधान सुरवाडे यांना पोलीस स्टेशनमध्ये मारहाण झाल्याची घटना ताजी असतानाच, आज पुन्हा तालुका पोलीस स्टेशनमध्ये पोलिसावर हल्ला करण्यात आल्याची घटना घडली आहे.