जालना जिल्हा परिषदेचा तुघलकी कारभार; बनावट स्वाक्षरीने 33 लाख काढण्याचा प्रयत्न

367

जालना जिल्हा परिषदेच्या लेखा विभागाचा तुघलकी कारभार चव्हाट्यावर आला आहे. त्यांच्या विभागातून 6 धनादेश चोरी झाले आहेत. त्यातील दोन धनादेशावर मुख्य लेखा व वित्त अधिकारी यांची बनावट स्वाक्षरी करून, 33 लाख 8 हजार 624 रूपयांचा धनादेश स्टेट बँक ऑफ इंडीया शाखा शिवाजी पुतळा येथून वटविण्याचा प्रयत्न केल्याच्या आरोपावरून मनोज निवृत्ती गायकवाड व सुनिल सुधाकर रत्नपारखे (दोघेही रा. जालना) यांच्याविरूध्द कदीम ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. हा प्रकार 13 ऑगस्ट 2019 पूर्वी जि.प. लेखा विभागात घडला. चोरून नेलेल्या धनादेशाचा क्रमांक 486079, 634646, 634647, 634648, 634660, 634661 असे आहेत.

या खळबळजनक घटनेची माहिती अशी की, जालना जिल्हा परिषदेत मुख्य लेखा व वित्त अधिकारी उत्तम चव्हाण यांचा स्वतंत्र कक्ष आहे. येथे रोखपाल किशोर शेजवळकर, सिध्दार्थ पटेकर, विजय  खापरे हे कर्तव्यास आहेत. दरम्यान 13 ऑगस्ट रोजी रोखपाल सिध्दार्थ पटेकर कर्तव्य करीत असतांना हस्तांतरीत योजनेचे खाते क्रमांक 52069195131 ची धनादेश पुस्तिका व जिल्हा परिषद उपकर योजनेचे खाते क्रमांक 62087387371 चे धनादेश एकूण 100 धनादेश आहेत.

यातील अनुक्रमे 5 व 1 असे 6 धनादेश चोरी गेले आहे. सदरील धनादेश चोरी लक्षात येताच त्यांनी यासंदर्भात मुख्य लेखा व वित्त अधिकारी उत्तम चव्हाण यांना ही बाब सांगितली. त्यानंतर उत्तम चव्हाण यांनी स्टेट बँक ऑफ इंडीया शिवाजी पुतळा जालना येथे धनादेश चोरी गेल्यामुळे त्याचा गैरवापर टाळण्याकरीता पेमेन्ट स्टॉपचे पत्र दिले. व धनादेश शोध घेण्याबाबत कर्मचाऱ्यांना सूचना दिल्या.

दरम्यान बँकेच्या अधिकाऱ्यांनी माहिती दिली की, धनादेश क्रमांक 634646 दि. 14/ऑगस्ट रोजी 957824 रूपये मनोज निवृत्ती गायकवाड यांच्या नावे व धनादेश क्रमांक 6346661 दि. 14 ऑगस्ट 2019 रोजी रक्कम 23 लाख 50 हजार 800 रूपये सूनिल सुधाकर रत्नपारखे यांच्या नावे धनादेश अदा करण्याबाबत बँकेत सादर केले आहेत.  दरम्यान मुख्य लेखा व वित्त अधिकारी उत्तम चव्हाण यांनी तिन्ही रोखपालांना बरोबर घेवून बँकेत तपासणी केली असता, धनादेशावर लिहिलेला मजकुर हा वित्त विभागातील कर्मचाऱ्यांनी लिहीला नव्हता. दोन्ही धनादेशावर पदनाम दर्शविणारा शिक्का नव्हता. तसेच मुख्य लेखा व वित्त अधिकारी उत्तम चव्हाण यांची बनावट स्वाक्षरी त्यावर होती.

याबाबत कदीम जालना पोलिस ठाण्यात उपमुख्य  लेखा व वित्त अधिकारी प्रविण धोंडीराम निर्मळ (रा.शिवनगर, जालना) यांच्या फिर्यादीवरून मनोज गायकवाड व सूनिल रत्नपारखे याच्याविरुध्द भांदवि कलम 379, 420, 511, 34 अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला. तपास सपोनि मोरे करीत आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या