देशात महापुरुषांचा इतिहास पुसण्याचा प्रयत्न केला जात आहे – छगन भुजबळ

महात्मा गांधी, नेहरू यांनी देशाच्या जडणडणीत दिलेलं योगदान अतिशय महत्वपूर्ण आहे. देशाचा इतिहास हा त्यांच्याशिवाय पूर्ण होऊ शकत नाही. मात्र देशातील काही मंडळींकडून देशाच्या या महापुरुषांचा इतिहास पुसण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यांचा हा प्रयत्न कदापिही यशस्वी होऊ शकत नाही असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ आमदार छगन भुजबळ यांनी केले. ज्येष्ठ पत्रकार सुरेश भटेवरा यांच्या ‘शोध गांधी नेहरू पर्वाचा’ या पुस्तकाच्या तृतीय आवृत्तीचा लोकार्पण सोहळा नाशिकच्या कालिदास कलामंदिर येथे पार पडला, त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी ज्येष्ठ पत्रकार खासदार कुमार केतकर, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, माजी आमदार उल्हास पवार, पुस्तकाचे लेखक ज्येष्ठ पत्रकार सुरेश भटेवरा, मनोविकास प्रकाशनचे अरविंद पाटकर यांच्यासह राजकीय, सामाजिक, पत्रकारिता यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

यावेळी छगन भुजबळ म्हणाले की, मोतीलाल नेहरू यांच्या जीवनात स्वदेशी आंदोलनाने मोठे परिवर्तन घडवले. नेहरू कुटुंबाने परदेशी वस्रांचा केवळ त्यागच केला नाही तर त्याची होळी पेटवली सारे कुटंबच खऱ्या अर्थाने आंदोलक बनले होते. आज देशात याच महापुरुषांचा इतिहास चुकीच्या पद्धतीने मांडला जात आहे. ज्या हिंदुस्थानासाठी हे महापुरुष लढले त्यांची बदनामी केली जाते. हे फार दुर्दैवी असल्याचे सांगत

लुटेगी आजादी अगर तो अपमान सबका है,
मत फैलाओ नफ़रतें, ये जहान सबका है,
इंसान बनने की आदत डालो,
क्या हिन्दू क्या मुस्लिम ये हिन्दुस्तान सबका है.. या ओळींमधून त्यांनी आपले मत व्यक्त केले.

ते म्हणाले की आज नेहरू आणि सरदार वल्लभभाई पटेल यांच्या विषयी दुही निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे, हे दुर्दैव आहे. सरदार पटेल यांचं निधन झालं तेव्हा मी एकटा पडलो आहे, उदासीची पोकळी जाणवते आहे. आपण आपल्या स्वातंत्र्य चळवळीतला मोठा ”कॅप्टन” गमावला असल्याच्या भावना त्यांनी व्यक्त केल्या होत्या याची आठवण त्यांनी यावेळी करून दिली.

ते म्हणाले की, देश स्वातंत्र्य झाल्यावर नेहरुंनी केलेले भाषण तर सुवर्ण अक्षरात लिहुन ठेवावं असच आहे. १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाल्यापासून 17 वर्ष नेहरुजी पंतप्रधान होते. आधुनिक हिंदुस्थान उभा करताना, समाजवादी समाजरचनेची, विज्ञाननिष्ठ भारताची, संमिश्र अर्थव्यवस्थेची बलशाली करण्याची अनेक स्वप्ने त्यांनी पाहीली आणि सत्यात उतरवली सुद्धा असे त्यांनी सांगितले.

ते म्हणाले की, देशात नेहरूंनी अनेक महत्वाच्या संस्था निर्माण केल्या. हिंदुस्थानच्या आधुनिक जडणघडणीत त्यांचे योगदान मोठे आहे. त्यांनी उभारलेल्या संस्था आणि प्रकल्पांनी या देशाला विकासाची वाट दाखवली. देशात तंत्रज्ञानाचा जो विकास झाला तो राजीव गांधी यांच्यामुळेच झाला आहे. त्याच तंत्रज्ञानाचा वापर करून नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान बनले असा चिमटा त्यांनी यावेळी काढला.

ते म्हणाले की, क्या किया आझादी के बाद असा सवाल सध्याच्या परिस्थितीत उपस्थित केला जात आहे. नेहरू गांधी परिवाराला टार्गेट करण्याचा प्रकार सध्या सुरू आहे. त्याला नेहरू गांधी पर्वाचा हे पुस्तक उत्तर आहे. देशाच्या जडणघडणीत नेहरु- गांधी पर्वाने जो अमुलाग्र बदल घडविला तो या पुस्तकाच्या माध्यमातुन मांडण्याचा प्रयत्न सुरेश भटेवरा यांनी केलेला आहे. कितीही इतिहासातली पाने बदलण्याचा प्रयत्न काही मंडळींनी केला तरी जो पर्यंत भटेवरा यांच्या सारखे पत्रकार लिहत राहतील तो पर्यंत खरा इतिहास समोर येत जाईल असे सांगत या पुस्तकाच्या इतर भाषेत लवकरात लवकर अनुवाद करण्यात यावा जेणेकरून संपूर्ण देशासमोर हा इतिहास मांडला जाईल असे त्यांनी यावेळी सांगितले.